Jalgaon

Jalgaon Live: 75 years of Independence:  दलित महिलेवर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मनाई..!

Jalgaon Live: 75 years of Independence: दलित महिलेवर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मनाई..!
दलित महिलेवर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास गावातीलच इतर ग्रामस्थांनी विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचोरा तालुक्यातील निपाणे गावात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दलित महिलेच्या अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्या ११ जणांविरोधात आज बुधवारी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पाचोरा तालुक्यातील निपाणे येथे ११ सप्टेंबरला एका दलित समाजाच्या महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाले. तिच्या मुलासह कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह दुसऱ्या दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास गावातीलच शासकीय जिल्हा परिषदेने बांधलेल्या स्मशानभूमीत नेला. स्मशानभूमीत ज्या ठिकाणी सर्वांवर अंत्यसंस्कार केले जातात, त्या स्मशानभूमीतील ओट्यावर शेडखाली या दलित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास गावातील इतर समाजाच्या काही ग्रामस्थांनी विरोध केला. यामुळे स्मशानभूमीत गोंधळ निर्माण झाला होता.

आमच्या समाजातील अंत्यसंस्कार इथे केले जातात, तुम्ही या ठिकाणी अंत्यसंस्कार करू नका, असे संबंधितांनी दलित महिलेच्या कुटुंबीयांना तसेच नातेवाईकांना सांगितल्याने गोंधळ निर्माण झाला. यावेळी वाद वाढू नये म्हणून मृत महिलेच्या नातेवाईकांनी स्मशानभूमीजवळच एका जागेवर मोकळ्या जागेवर महिलेवर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. या घटनेची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली. त्यानुसार बुधवारी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास जातीयतेच्या कारणावरून विरोध करणाऱ्या तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button