Indapur

इंदापूरमध्ये लॉकडाऊन अधिक कडक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार.

इंदापूरमध्ये लॉकडाऊन अधिक कडक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मुंबई आणि पुण्या पाठोपाठ कोरोनाचे काही रुग्ण इंदापूर नजीक बारामतीमध्येही आढळले आहेत. या अनुषंगाने इंदापूरमध्ये प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून पूढील काही दिवस लॉकडाऊन अधिक कडक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अशी माहिती इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्ण इंदापूर शहर पुढील काही दिवसांसाठी पूर्णपणे आयसोलेट करण्यात येणार आहे. यासाठी इंदापूर शहरात दाखल होणारे सर्व मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. शहरातील गर्दी टाळण्यासाठी दवाखाने आणि औषधालये वगळता भाजीमंडई सहित सर्व दुकानेही उद्यापासून पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. नगरपरिषदेच्या वतीने भाजीपाला व दूध विक्रेते तसेच किराणा मालाच्या दुकानदारांनी ग्राहकांना घरपोच सुविधा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापैकी भाजीपाला आणि दूध विक्री करणाऱ्यांना सकाळी ७ ते १० या वेळेतच हे काम करावे लागणार आहे तर औषधालये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत.

सर्व इंदापूरकरांनी आपल्या घरीच सुरक्षित राहावे. शासन आपल्या स्तरावर कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी योग्यरीत्या कामकाज करत आहे. तरी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल आणि नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button