Breaking: शिवसेना कुणाची..? याबाबत कधी लागणार निकाल.. कदाचित पुढच्या वर्षी..! वाचा कारण..
राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. पण सुप्रीम कोर्टाकडून अद्यापही शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर निकाल देण्यात आलेला नाही. या प्रकरणाची सुनावणी कधी होणार आणि निकाल कधी लागणार? याबाबतची नवी अपडेट आता समोर आली आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकाल आता पुढच्या वर्षात येण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल नाहीच लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे? यावरील सुनावणीची संभाव्य तारीख १८ नोव्हेंबर आहे. पण ८ नोव्हेंबर हा विद्यमान सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कार्यकाळात शिवसेना पक्षाचे चिन्ह प्रकरणाचा निकाल येणार नाही हे स्पष्ट झालं आहे. आता नव्या पीठाकडे प्रकरण वर्ग केलं जाणार आहे. मंगळवारी सकाळपर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीसाठीची संभाव्य तारीख ८ नोव्हेंबर होती. त्यामुळे ८ नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी होते का? याची सर्वांना उत्सुकता होती.
दरम्यान, ८ नोव्हेंबरला सुनावणी होणाऱ्या प्रकरणांची यादी मंगळवारी संध्याकाळी प्रसिद्ध झाली. यामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाचा समावेश नाही. त्यामुळे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी आता होणार नाही आणि निकालही येणार नाही हे स्पष्ट झाले. फेब्रुवारी २०२३ मध्ये हे प्रकरण ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये यावर शेवटची सुनावणी झाली. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात या सुनावणीच्या तारखा पडत आहेत. मात्र सुनावणी झाली नाही.






