Pune

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण..

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण..

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत बिबट्याने धुमाकूळ घातलाय. शेतशिवारातील बिबट्या थेट शहरीभागात आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
गेल्या महिन्यापासुन बारामती तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच बारामती नजीक असलेल्या एका कंपनीमध्ये बिबट्या वावरत असणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असतानाच काटेवाडी-कन्हेरी जवळील ओढ्यालगत चरणाऱ्या मेंढ्याच्या कळपावरती बिबट्याने हल्ला करुन मेंढीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

बिबट्या बारामती शहरानजीक असल्यामुळे शहरासह तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाव परिसरात धुमाकूळ घातलाय. त्यामुळे प्रशासन आता या बिबट्याला किती तत्परतेने जेरबंद करतंय हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

मागील आठवड्यात बिबट्याने काटेवाडी नजीक असलेल्या एका शेतात कुत्र्याचा फडशा पाडला होता. त्यामुळे आता काटेवाडी व कन्हेरी गावात बिबट्या वावरत असल्याची चर्चा रंगत होती. ही घटना ताजी असतानाच काटेवाडी-कन्हेरी जवळील ओढ्यालगत चरणाऱ्या मेंढ्याच्या कळपावरती बिबट्याने हल्ला केला. शेतकरी महादेव काळे व आनंदा केसकर यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याचा पाठलाग करुन हुसकावून लावून मेंढ्यावरील हल्ला परतावून लावला आणि मेंढ्याचा जीव वाचवला.

आईपासून दुरावला 21 दिवसाचा बछडा, संजय गांधी नॅशनल पार्क टीम करतेय पोटच्या मुलासारखा सांभाळ

शेतकऱ्याच्या धाडसाने मेंढीला जीवदान –
काटेवाडी जवळील धनेवस्ती येथील विजय काटे यांच्या शेतात मेंढ्या चरत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने कळपावर हल्ला केला. एका मेंढीला बिबट्याने मानेला जबड्यात धरुन फरपटत नेली. यामुळे इतर मेंढ्या भांबावल्या. हा प्रकार लक्षात आल्याने काळे यांनी धाडसीपणाने बिबट्याचा पाठलाग केला. तोपर्यंत बिबट्याने तीन चार एकर क्षेत्रातुन मेंढी फरपटत नेली. मात्र, काळे यांनी त्याचा पाठलाग सुरू ठेवत त्याच्यावर काठीने हल्ला केला. त्यामुळे बिबट्याने मेंढीला सोडत ऊस क्षेत्रामध्ये पळ काढला. काळे यांनी मोठ्या धाडसाने मेंढीचा जीव वाचवला, त्यानंतर याबद्दल वनविभागाला माहिती देण्यात आली. वन विभागानं या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असून इतर उपाययोजनाही केल्या आहेत. मात्र, बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं शेतमालक विजय काटे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच गावात ही घटना घडल्याने प्रशासन किती तत्परता दाखवते , याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button