Nandurbar

शनिवार व रविवार जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

शनिवार व रविवार जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात कोविड-19 विषाणू बाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा नगर पालिका क्षेत्र तसेच अक्राणी नगर पंचायत व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात येत्या 15 एप्रिलपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले असून जनता कर्फ्युला स्वत:हून प्रतिसाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

या क्षेत्रात आठवड्याच्या शनिवारी व रविवारी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना,गॅस वितरण सुविधा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. वरील ठिकाणातील अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या वाहनासाठी पेट्रोलपंप सुरू राहतील, अन्य वापरासाठी प्रतिबंध असेल. सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना व शासकीय कार्यालये या दिवशी बंद असल्याने शनिवार व रविवारी कोणीही बाहेर पडू नये. वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडताना रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे. आठवड्यातील इतर दिवशी सर्व आस्थापना, दुकाने सकाळी 6 ते सायं. 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल.

कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button