गॅस सिलिंडर च्या किमतीपेक्षा जास्त दर घेतल्यास वितरकावर होणार कारवाई तर सिलेंडर घरपोच डिलीवरी मोफत होणार!
रजनीकांत पाटील
जळगाव – एलपीजी सिलिंडर वितरण करताना घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी केल्यास या पुढे वितरकांवर थेट कारवाई केली जाणार असून तसा निर्णयच गॅस वितरण करणाऱ्या तीनही कंपन्यांनी घेतला आहे.
या संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासनानेदेखील असे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहे. या पूर्वी अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभागाच्यावतीने २००१, २००८ मध्ये गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या वितरकांसाठी घरपोच शुल्क निश्चित करून देण्यात आले होते.
मात्र त्यानंतर असे शुल्क आकारू नये असे गॅस वितरण कंपन्यांचे म्हणणे होते. त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पत्र व्यवहारही केले. त्यानंतर असे शुल्क आकारू नये, असा निर्णय कंपन्यांनी घेतला. तसे आदेशही राज्यात सर्व प्रथम जळगाव जिल्हा प्रशासनाने काढले व घरपोच सिलिंडरसाठी शुल्क आकारू नये असे स्पष्ट निर्देश दिले होते.
मात्र यावर गॅस वितरकांनी बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवार, ७ सप्टेंबर रोजी जळगाव येथे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आॅईल या तीनही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.






