Usmanabad

औराद शहाजनीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय

औराद शहाजनीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय

प्रतिनिधी सलमान पठाण

औराद शहाजानी: येथील पोलीस ठाण्याकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवार दिनांक १९ रोजी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी औराद शहाजानी येथील सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच गावातील नागरिकांना बोलाविण्यात आले होते.

यावेळी औराद शहाजानीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी यावर्षीचा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याबाबत आपली भूमिका मांडली व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचे आवाहन गावातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले.

याप्रसंगी माजी सरपंच मोहनराव भंडारे यांनी गावातील मठ-मंदिरातील पाच गणेश मंडळांना परंपरा अबाधित ठेवण्यासाठी परवानगी देऊन त्यांना केवळ दोन-तीन जण एवढ्या मर्यादित संख्येत दैनंदिन पुजा करू देण्याचा प्रस्ताव ठेवला. याला उपस्थित गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सर्वानुमते संमती दिली. त्याला सपोनि सुधीर सूर्यवंशी यांनी मान्यता दिली.तसेच दरवर्षी प्रमाणे मिरवणूक काढणे व कोणतेही कार्यक्रम होणार नसल्याने जमा होणाऱ्या वर्गणीतून व औरादच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने गणेशोत्सव काळात औरादमध्ये कोरोना तपासणी कॅम्प घेण्याचे आवाहन सपोनि सुधीर सूर्यवंशी यांनी केले.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष राजा पाटील यांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल गणेश मंडळांचे आभार मानले. या बैठकीस ग्रामसेवक धनाजी धनासुरे, औराद कृउबा समिती संचालक सुधाकर शेटगार, मल्लिकार्जुन लातूरे, रवि गायकवाड, महेंद्र कांबळे, दत्ता बोंडगे, कन्हैया पाटील, पद्मसिंह पाटील, बालाजी भंडारे व गणेश मंडळाचे कार्यकर्ते सोशल डिस्टन्स ठेवून उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button