विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उच्चतम प्रेरणेचे अक्षयस्त्रोत – कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल
प्रज्ञासूर्य, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तचरित्र व विचार प्रेरणेचा अखंड स्त्रोत असून अवघ्या विश्वात *द सिम्बॉल ऑफ नॉलेज* (ज्ञानाचे प्रतीक) म्हणून गौरविण्यात आलेल्या व वंचित आणि दुर्लक्षित समाजाला एकसंघ करून *शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा* असा संदेश देऊन माणुसकीचे दर्शन ज्यांच्या आचार व विचारातून घडते अशा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी शतदा नतमस्तक होऊन त्यांच्या विचारांना व संस्कारांना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे उत्तरदायित्व समाजातील प्रत्येकाचे आहे व हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल असे मत कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी व्यक्त केले.
ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती च्या औचीत्याने मैत्री संघटन, शांती नगर परिसर भुसावळ यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमांतर्गत *भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे समाज प्रबोधनात्मक विचारांची समकालीनता* या विषयावर आयोजित व्याख्यानसभेत बोलत होते.
याप्रसंगी मैत्री संघटनचे अध्यक्ष प्रा डॉ जगदीश जी खरात यांच्या सोबत आयुष्यमान एस. एम. रायभोळे, धम्मचारी आर्यसागर, प्रा. डॉ. जे. वी.धनविज, वसंत सोनवणे, प्रा. मुकेश पवार, प्रा. सुभाष वानखडे ,आयुष्यमान जगदेव साहेब व इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी यासोबत समाजातील बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. दिनकर हेलोडे यांनी केले. त्यात कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत व मनामनापर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट असल्याचे मत मांडण्यात आले.
याप्रसंगी आयुष्यमान अनिल भालेराव ,आयुष्यमान प्रशांत नरवाडे, सौ मालती धनवीज यांनी सुमधुर उत्कृष्ट भीम गीतांचे सादरीकरण करून वातावरण निर्मिती केली व उपस्थितांचे मने जिंकली.
यावेळी आराध्या वानखेडे *भारतीय राज्यघटनेचा सरनामा* मुखोद्गत सादर करून कौतुकास पात्र ठरली.
प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. दिलीप बोदडे यांनी करून दिला. याप्रसंगी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र विविध प्रसंग रूपाने उपस्थितांसमोर मांडून त्यांचे विचार सध्य परिस्थीत किती समर्पक आहेत याविषयी सविस्तर विवेचन केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा डॉ जगदीश जी खरात यांनी संपूर्ण समाज उद्धारासाठी कोणकोणत्या गोष्टी प्राधान्याने केल्या पाहिजेत याविषयी सविस्तर विवेचन केले. समाजातील हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी जनसहभागातून ग्रंथालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे, यासोबत समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजातील प्रत्येक घटकाच्या उद्धारासाठी नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करणे, आर्थिक सहयोग, मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे काम करावे असे आवाहन केले. व्याख्यान सभेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम उल्लेखनीय व अभिनंदननीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी मैत्री संघटन, शांती नगर परिसर भुसावळ ची नूतन कार्यकारिणी स्वयंस्फुर्तीने निवडण्यात आली. त्यात
*अध्यक्ष* प्रेरणा भारत नरवाडे
*उपाध्यक्ष* वैशाली राजेंद्र उमरे
*सचिव* सीमा प्रशांत नरवाडे
*कोषाध्यक्ष* प्रा.डॉ.जे व्ही धनवीज
*सल्लागार* व्ही टी जगदेव
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व त्यांचा कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मालती धनविज यांनी तर
आभार आयु. महेंद्र तायडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य व परिश्रम घेतले.






