Pune

शिवाजीनगर बसस्थानक मंगळवारपासून बंद

शिवाजीनगर बसस्थानक मंगळवारपासून बंद

दत्ता पारेकर
पुणे–

मेट्रोच्या कामाला शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाचे बसस्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित केले जाणार आहे. मंगळवारपासून दि. ३१ सर्व मार्गांवरील बस नियमित वेळापत्रकानुसार नवीन वाकडेवाडी स्थानकातून सुटणार आहेत. नवीन स्थानकात प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती एसटी अधिकार्यांनी दिली.मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर येथे एसटीचे बसस्थानक आहे. तिथून मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यातील अनेक ठिकाणांसाठी बस संचलन सुरू आहे. पुण्यात मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर हे स्थानक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी मेट्रोचे जमिनीखाली स्थानक होणार आहे. त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच काही महिने आधीपासून वाकडेवाडी येथील अंडी उबवणी केंद्राच्या जागेमध्ये नवीनबसस्थानक उभारणी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तेथील कामही सुरू केले. पण विविध कारणांमुळे हे स्थलांतर रखडले होते. अखेर त्याला मुहूर्त मिळाला असून, मंगळवारपासून शिवाजीनगर स्थानकातील सर्व संचलन वाकडेवाडी येथील स्थानकातून केले जाणार आहे. हे स्थलांतर सोमवारीच करण्याचे नियोजन होते. पण ख्रिसमस तसेच दोन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे सोमवारी प्रवाशांची एसटीला खूप गर्दी असेल. अचानक स्थलांतर केल्यास त्यांची गैरसोय होऊ शकते. म्हणून मंगळवारपासून सर्व संचलन या स्थानकातून होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या शिवाजीनगर बसस्थानकातून दररोज सुमारे १४०० बस ये-जा करतात. औरंगाबाद, नाशिक, नगर, नागपूर, अमरावती, अकोला,गेवराई, बीड, लातूर, पणजी यांसह विदर्भ व मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून या बस ये-जा करत आहेत. या सर्व बस आता वाकडेवाडी स्थानकातून सुटतील. यापैकी एकही बस शिवाजीनगरकडे येणार नाही. वाकडेवाडी येथे एकूण १९ फलाट उभारण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. हे काम विलंबाने पूर्ण झाल्याने स्थलांतराला उशीर झाल्याचे अधिकारी म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button