मनपातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व विमासरंक्षण तात्काळ द्या – राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : नाशिक मनपा रुग्णालयात नेमण्यात आलेल्या कंत्राटी वार्ड बॉय, मल्टी स्किल हेल्थ वर्कर, आया, ए.एन.एम, स्टाफ नर्स, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आयुष अधिकारी आदींचे थकीत वेतन तात्काळ देण्यात येऊन या कर्मचाऱ्यांचे विमासंरक्षण देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक मनपा आयुक्त यांच्या दि.२६ फेब्रुवारी २०२१ च्या आदेशान्वये कोविड सदृश्य परिस्थित नियंत्रण होणेसाठी रोजी वार्ड बॉय, मल्टी स्किल हेल्थ वर्कर,आया,ए.एन.एम,स्टाफ नर्स, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आयुष अधिकारी या पदाची तात्पुरत्या स्वरुपात व तात्काळची नोकर भरती करण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य बघता सर्व कर्मचारी वर्ग विविध आस्थपना येथे कर्तव्यावर हजर झाली. सदर कर्मचारी यांना वेळीच वेतन हा मूलभूत अधिकार आहे. तसेच कोविड अनुषंगाने त्यांना सुरक्षा दृष्टीने उपयोगी वस्तूंचे वाटप वेळच्या वेळी होणे अपेक्षित आहे. आपला जिव धोक्यात टाकून सर्व कर्मचारी काम करत असताना त्यांना विमा व इतर आरोग्य सुविधा देखील मिळणे अपेक्षित असतांना गेल्या 3 महिन्यापासून कुठल्याही प्रकरचा मोबदला दिला गेला नसल्याचे म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या या सर्व आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत वेतन, विमा संरक्षण व इतर सुविधा तातडीने देण्यात याव्यात अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अंबादास खैरे यांनी दिला आहे.
यावेळी सागर बेदरकर, रवी रकटे, आकाश कासार, अतुल उदावंत, सुमित धाईजे आदी उपस्थित होते.






