Latur

सर्पदंशा नंतर रक्ताची चाचणी करणारी शासकीय रुग्णालयातील मशीन अनेक दिवसापासून बंद. खाजगी लॅब घेतात ६५० रुपये

सर्पदंशा नंतर रक्ताची चाचणी करणारी शासकीय रुग्णालयातील मशीन अनेक दिवसापासून बंद…खाजगी लॅब घेतात ६५० रुपये

दि. ६ – लातूर लक्ष्मण कांबळे

शहरातील शासकीय रुग्णालयांमधील सर्पदंश झाल्यानंतर रक्ताची चाचणी करणारी मशीन अनेक दिवसापासून बंदच आहे. सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खुरपणी चालू आहे. सोयाबीन मध्ये खुरपणी करणाऱ्या शेतमजुरांना आणि शेतकऱ्यांनाही सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. काल दिनांक ५ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी दोन वाजता सोयाबीनची खुरपणी करत असताना लातूर तालुक्यातील वसवाडी जवळील श्रीमती कांचन वामन तांबे नामक महिलेला सर्पदंश झाला म्हणून सदरील महिलेस लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तेथील डॉक्टरांनी सदरील महिलेचे रक्त तपासण्यासाठी बाहेर पाठवावे लागेल असे सांगितले व त्या महिलेच्या नातेवाइकाकडून रक्त तपासणी फीस म्हणून ६५० रुपये घेण्यात आले. सदरील डॉक्टरला ही तपासणी बाहेर का करावी लागत आहे असे विचारले असता त्या डॉक्टरांनी रुग्णालयातल्या मशीन अनेक दिवसापासून बंद पडल्या असल्याचे सांगितले. डॉक्टर साहेबांना आपले नाव व मोबाईल नंबर काय आहे असे विचारले असता आम्हाला नाव व मोबाईल नंबर सांगायची परवानगी नाही असे सांगितले. गोरगरीब लोकांना रक्ताच्या तपासणीसाठी ६५० रुपये विनाकारण भुर्दंड भरावा लागत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये खाजगी लॅबचे एजंट आणि खाजगी मेडिकल दुकानचे एजंट कायमस्वरूपी तेथेच थांबलेले असतात. गरीब रुग्णांची होणारी हेळसांड लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री थांबवतील का ? असा प्रश्न भाजपा नेते तथा लातूरचे ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी विचारला आहे.

शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना बाहेरून रक्त तपासून आणायला लावणे आणि औषध गोळ्यांच्या चिठ्ठ्या लिहून देणे हे प्रमाण खूपच वाढले आहे. खाजगी मेडिकल दुकान व खाजगी लॅब यामध्ये शासकीय रुग्णालयातील कोणकोणते डॉक्टरचे हितसंबंध गुंतले आहेत. त्याची चौकशी करावी. अशीही मागणी व्यंकटराव पनाळे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांच्याकडे केली आहे. ड्युटीवर असलेले डॉक्टर व कर्मचारी यांनी आपल्या नावाची नेम प्लेट किंवा रुग्णालयाचे शासकीय ओळखपत्र ड्रेस वर लावणे आवश्यक आहे. जे अधिकारी किंवा कर्मचारी ड्रेस वर नेमप्लेट किंवा ओळखपत्र लावत नाहीत त्यांच्यावर ही कार्यवाही करण्याची मागणी पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button