?️ चक्रीवादळ आणि प्रशासनाची तयारी..?
चक्रीवादळात नेमकं काय होणार?
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 3 आणि 4 जूनला बहुतांश ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. हे मोसमी वारे प्रतिताशी 45 ते 55 किमी वेगानं वाहत असून अरबी समुद्राच्या आग्नेय आणि मध्य-पूर्व भागात पोहोचेपर्यंत ते प्रतिताशी 65 किमी वेगानं वाहायला लागतील.
यावेळी अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या भागात समुद्राची पातळी उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. 2 जूनपासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात मोसमी वारे पोहोचल्यानंतर ती आणखी उग्र होण्याची शक्यता आहे.
तर 3 जूननंतर मोसमी वारे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर ती रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ कुठे आदळणार?
हे वादळ अलिबाग भागात धडकणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितलं. आज दुपारून हे वादळ अलिबागजवळ जमिनीवर धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहेच.
निसर्ग चक्रीवादळ हरिहरेश्वर आणि दमणच्या मधून जाईल, असा अंदाज पहिल्यापासूनच वर्तवला जात होता.
चक्रीवादळाचा मार्ग काय?
3 जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतर हे वादळ दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल.
पालघरचे उपजिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं, “आम्हाला सांगण्यात आलंय की पालघरमध्ये लँडफॉल होईल. आम्ही तयारी केली आहे. NDRFच्या तुकड्याही इथे आल्या आहेत.”
यामुळे महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तर या वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन, जोरदार पाऊस येण्याची शक्यता असून यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.
समुद्राला उधाण आल्यामुळे मुंबई, ठाणे तसंच रायगड जिल्ह्यातल्या सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं तसंच रत्नागिरी जिल्ह्यातली अशीच परिस्थिती उद्भवू शकते असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
प्रशासनाने काय तयारी केली आहे?
‘निसर्ग चक्रीवादळा’ला तोंड देण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे.
अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळच्या किनारपट्टीवर 2 जूनपर्यंत, कर्नाटमध्ये 3 जून, तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 4 जूनपर्यंत मच्छिमारी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या 16 तुकड्यांपैकी 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, SDRFच्या सहा तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मंत्रालयातदेखील 24 तास नियंत्रण कक्ष सुरू असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मच्छीमाराना समुद्रातून बोलवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी तटरक्षक दलाला देखील सूचना देण्यात आली आहे. 
कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना हलवण्यात येणार असून त्यांच्यासाठी निवारा केंद्र तयार ठेवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात सोमवारी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाली. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
मुंबईतील सखल भागातील झोपडपट्टीवासीयांना स्थलांतरीत करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणु उर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- घराबाहेर असलेल्या मोकळ्या वस्तू अन्यत्र ठिकाणी हलवा.
- महत्त्वाचे दस्ताऐवज प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा.
- बॅटरीवर चालणारी उपकरणं चार्ज करून ठेवा, तसंच राखीव इलेक्ट्रिक यंत्र जसं की बॅटरी टॉर्च आणि पावर बँक हेसुद्धा चार्ज आणि सज्ज करून ठेवा.
- विद्युत उपकरणं तपासा. जोरदार पाऊस होत असेल तर शक्यतो बंद करून ठेवा.
- दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या बातम्यांकडे, सूचनांकडे लक्ष ठेवा. इतर कोणत्याही खात्री नसलेल्या बातम्या पसरवू नका.
- आपात्कालीन उपयोगी वस्तूंची किट बॅग तयार ठेवा. त्यात पुरेसं पाणी, अन्नसाठा आणि औषधी, इत्यादी गरजेच्या वस्तू ठेवा.
- मोठं तात्पुरतं छप्पर असलेल्या जागा टाळा. डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हातांचा उपयोग करा.
- पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा.
कोरोना आणि चक्रीवादळ
कोरोनाचे गंभीर संकट असताना त्यात आता निसर्ग चक्रीवादळाचं आव्हान राज्य प्रशासनासमोर आहे. मदत आणि बचाव कार्य करताना कोरोनाचा फैलाव होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
नॉन-कोव्हिड हॉस्पिटल्स मदतीसाठी उपलब्ध करणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तसंच कोरोनासाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलमधिल रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्याचा विचार आपत्ती व्यवस्थापनाकडून केला जात आहे.






