Amalner: दिव्यांग व्यक्तींसाठी “कृत्रिम हात-पाय प्रत्यारोपण” शिबीर संपन्न
अमळनेर- येथील कै. सुंदरबाई बन्सीलाल अग्रवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नारायण सेवा संस्थान (उदयपूर) व जिल्हा अग्रवाल संघटन (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 150 दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात-पाय प्रत्यारोपण करण्यात आले. ज्यावेळेस त्यांना हे कृत्रिम हातपाय लावण्यात आले, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही सुंदरबाई अग्रवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते या दिव्यांग व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, नारायण सेवा संस्थानचे कॅम्प इन्चार्ज हरिप्रसाद लठ्ठा, जिल्हा अग्रवाल संघटनचे पवन मित्तल व सुरेश अग्रवाल, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट दिलीप गांधी व प्रेसिडेंट प्रतीक जैन आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नारायण सेवा संस्थान तर्फे होत असलेल्या कार्याचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक सीए नीरज अग्रवाल यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून नारायण सेवा संस्थान यांनी केलेल्या कार्याची माहिती करून दिली. यावेळी मंत्री अनिल पाटील व जनार्दन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.
… शिक्षणाची घेतली जबाबदारी
कृत्रिम हात पाय प्रत्यारोपणाच्या या कार्यक्रमात जानवे (ता.अमळनेर) येथील नभिराज पाटील या चार वर्षीय दिव्यांग बालकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. गेल्या वर्षी झालेल्या अपघातात त्या बालकाला आपला एक पाय गमवावा लागला होता, त्याच अपघातात त्याचे पितृछत्रही हरपले होते. मात्र त्या दुःखद घटनेतून त्याच्या आईने त्याला पूर्णपणे बाहेर काढले होते. आईच्या प्रेरणेने त्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्याची किनार दिसून येत होती. त्या बालकांला कृत्रिम पाय लावल्यानंतर तो इकडे- तिकडे फिरू लागला… खेळू लागला. त्याची चुणूक बघून एकाने प्रश्न केल्यानंतर त्याने भविष्यात कलेक्टर होणार असल्याचे सांगितले. त्याचा हजरजबाबीपणा बघून सर्वानाच हायसे वाटले. आर्थिक कारणामुळे त्याच्या शिक्षणात अडचणी येत असल्याची माहिती मिळाल्यावर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन सीए नीरज अग्रवाल यांनी त्या बालकाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली. एकीकडे त्या बालकाला कृत्रिम पाय मिळाला तर दुसरीकडे पुढील शिक्षणाची हमी हे बघून त्या बालकाच्या आईला हायसे वाटले.
अमळनेर- दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय प्रत्यारोपण प्रसंगी उपस्थित कॅबिनेट मंत्री अनिल पाटील हरिप्रसाद लठ्ठा, बजरंग अग्रवाल, नीरज अग्रवाल व पदाधिकारी उपस्थित होते.






