Mumbai

Mumbai Diary:Dasara Melawa 2022:ठाकरेंना शिवतीर्थ मिळू नये म्हणून शिंदेंनी आखली ही रणनीती..!

Mumbai Diary:Dasara Melawa 2022:ठाकरेंना शिवतीर्थ मिळू नये म्हणून शिंदेंनी आखली ही रणनीती..!

मुंबई दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेनेच्या कुठल्या गटाचा दसरा मेळावा होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘शिवतीर्था’वर मेळावा घेता येऊ नये आणि ठाकरेंची परंपरा खंडित व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने रणनीती आखल्याची माहिती आहे. आधी अर्ज करणाऱ्यास प्राधान्य, या तत्त्वावर शिवाजी पार्क मैदानावर परवानगी दिली जात असल्यामुळे उद्धव ठाकरेंचं पारडं जड मानलं जातं. त्यामुळे ‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’ असं म्हणत शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानच गोठवण्याची तयारी केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची हरतऱ्हेने कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आधी ४० आमदार, मग १२ खासदार, काही माजी लोकप्रतिनिधी, अनेक पदाधिकारी, शिवसैनिक यांना फोडल्यानंतर शिंदेंनी ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्ती नेतेही गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी जुन्या जाणत्या नेत्यांनाही शिंदेंनी जवळ ओढण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हं यावर दावा सांगितलेला असतानाच आता शिवसेना, ठाकरे आणि दसरा मेळावा हे समीकरणही भेदण्याचा प्रयत्न शिंदे करताना दिसत आहेत.

शिवाजी पार्क मैदानावर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह अर्थात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर परवानगी दिली जाते. यात ठाकरेंची सरशी असल्यामुळे शिंदे गटाने बीकेसीतील एमएमआरडीए मैदानासाठी अर्ज केल्याचं बोललं जातं. मात्र शिंदेंनी याशिवाय मुंबईतील अनेक मोठ्या मैदानांवरही अर्ज केल्याची माहिती आहे.

त्यासोबतच दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी दावा केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिवाजी पार्कच्या परवानगीचा निर्णय गोठवला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. म्हणजेच ठाकरेंना शिवाजी पार्क किंवा बीकेसीच काय, तर मुंबईतील कुठलेही मोठे मैदान मिळू नये आणि त्यांना मेळावा घेण्यापासून रोखता यावे, यासाठी शिंदेंनी रणनीती आखल्याचं चित्र आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button