Maharashtra

माननीय मुख्यमंत्री साहेब पत्रकारांच्या वाट्याला फक्त उपेक्षा आणि शिव्याच असणार का ?

माननीय मुख्यमंत्री साहेब पत्रकारांच्या वाट्याला फक्त उपेक्षा आणि शिव्याच असणार का ?

ज्ञानेश्वर जुमनाके

महाराष्ट्र शासनाने सरकारी सेवेतील काही कर्मचार्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा जाहीर केला आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस आदी सरकारी सेवेतील लोकांसाठी ही सुविधा देवू केलीय. डॉक्टर, पोलिस आणि आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होवून काम करतायत. या सर्वांचे योगदान खुप मोठे आहे. त्यांना विमा जाहीर केलाय ते योग्यच आहे. प्रशासनातील अजूनही अशा दुर्लक्षित कर्मचार्यांना तो द्यायलाच हवा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते स्वत:चा जीव दावावर लावतायत. त्यामुऴे त्यांची जबाबदारी शासनाने घ्यायलाच हवी. पोलिस, आरोग्य कर्मचारी आणि इतर अधिकार्यांच्याबरोबर प्रत्यक्ष मैदानात पत्रकारही असतो. आताही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व कर्मचार्यांच्याबरोबर रस्त्यावर आहे तो फक्त पत्रकारच. सरकारने त्याला अत्यावश्यक यादीत टाकलय. कारण राजकीय हेतूने सामाजिक काम करणार्यांना त्याची गरज आहे. पत्रकार दवाखान्यात जातोय, कोरोनाबाधीत गावात जातोय, तो सर्वत्र फिरतोय. कोरोनाची खडानखडा माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवतोय. यात त्याला कधी प्रशासनाच्या रागाचे शिकार व्हावे लागतय, कधी नेत्यांच्या तर कधी लोकांच्या रागाची शिकार व्हावे लागतय. या सगऴ्यांच्याबरोबर कोरोनानेही त्याला सोडलं नाही. मुंबईतले पन्नासपेक्षा जास्त पत्रकार कोरोनाग्रस्त आहेत. यातल्या कुणाचा बऴी गेला तर काय ? त्याच्या कुटूंबाचे काय ? पत्रकारांच्या मुलाबाऴांचे, पत्रकारांच्या बायका-पोरांचे काय ? सरकार पत्रकारांना काय देणार ? सरकार त्याच्यासाठी विम्याची सोय करणार की फक्त मरणाचीच सोय करणार ? पत्रकारांची वरपर्यंत ओऴख असते म्हणून स्मशानातले साहित्य मोफत देणार का ? पत्रकारांची जबाबदारी मायबाप सरकार घेणार की नाही ? उध्दवजी, समाजासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणार्या पत्रकारांच्या वाट्याला फक्त उपेक्षा आणि शिव्याच असणार का ? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही. पत्रकार सर्वांचा तिरस्कार पचवून काम करत असतो. प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, डिजीटल मिडीया या सर्व माध्यमातून समाजाला माहिती देत असतो. ते ही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता.

मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागन झाल्याची बातमी आली आणि अनेकांच्या काऴजात धस्स झाले. इतर कर्मचार्यांना विमा आहे, चांगले पगार आहेत पण पत्रकारांचे काय ? त्याला कोण वाली ? त्याला कुणी धनी ना गोसावी ? अशी अवस्था आहे. राज्यकर्त्यांना पत्रकार आपली प्रसिध्दीची खाज पुरवण्यापुरते हवे असतात. त्याच्या नावाने सारे बोंब ठोकत असतात. जर पत्रकार नालायक आहेत तर समाजातले कोणते क्षेत्र स्वच्छ आहे ? प्रशासनातला कोणता विभाग स्वच्छ आहे ? कुठल्या विभागातले कर्मचारी स्वच्छ आहेत ? शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, समाजसेवक, नेते यातले कोण कोण स्वच्छ आहे ? कुणा-कुणाचे चारित्र्य शुभ्र आहे ? या देशातला राजा म्हणवणारा मतदार तरी स्वच्छ आहे काय ? मटन, दारू आणि हिरव्या नोटेवर स्वत:ला विकणारी ही सारी मंडऴी पत्रकारांना जेव्हा शिव्या देते तेव्हा हसू येते. एकदा एका पापी ठरवलेल्या महिलेला गावाच्या बाहेर आणून दगड मारत होते. तिथूनच बुध्द जात होते. त्यांनी ते चित्र पाहिले आणि म्हणाले, थांबा, या महिलेला जरूर मारा पण ज्याने आयुष्यात कधीच पाप केले नाही अशांनीच तिला दगड मारा. बुध्दांच्या त्या बोलण्यावरून लोक दगड मारायचे बंद झाले. कारण त्या लोकांच्याकडे तेवढी नैतिकता होती. इथे तेवढी नैतिकता कुणाकडे आहे ? ज्यांचे हात अशा कैक पापाने बरबटलेले असतात असे अनेक लोक नैतिकतेची प्रवचनं झोडत असतात. त्यांनी ठेकेच घेतलेत नैतिकतेचे. अशांचीच गर्दी पत्रकारांना शिव्या देताना दिसते. सौदेबाज किंवा विकावू म्हणताना दिसते. पण स्वत:चाच रोज लिलाव होतो तेव्हा त्यांना काहीच वाटत नाही. शेवटी पत्रकार आभाऴातून पडत नाहीत किंवा जमिन फाडून जन्माला येत नाहीत. ते याच विकावू समाजाचे अपत्य आहेत. काही पत्रकार जरूर नालायक आहेत याचा अर्थ सरसकट नालायक आहेत असा होत नाही. म्हणून पत्रकारांच्याकडेही सहानूभुतीने बघा, त्यालाही मोजा. त्याच्या कामाचा, त्यागाचा आणि बलिदानाचा विचार करा. पत्रकारही चुकतात, त्यांच्याही चुका होतात कारण ते माणूस असतात. पत्रकार सर्वद्न नाही, परिपुर्ण नाही कारण तो ही तुमच्यासारखाच हाडामासांचा माणूस आहे याचे भान ठेवा.

देशावर, समाजावर कोणतेही संकट येते तेव्हा तो प्रशासनाच्याआधी घटनास्थऴावर तो पोहोचतो. महापुर असेल, सुनामी असेल, भुकंप असेल किंवा इतर कोणतीही घटना असेल, सर्वात आधी घटनास्थऴी पोहोचतो तो पत्रकारच पोहोचतो. त्याच्या बातम्या आल्या की इतर पोहोचतात. तो रात्री-अपरात्री बातमीच्या मागे धावत असतो. दिवस-रात्र एक करून प्रत्येक घटना लोकांच्यासमोर आणि शासन दरबारी मांडत असतो. कुठे अन्याय झाला, कुठे मदतीची गरज आहे, कुणाचे ऑपरेशन करावयाचे आहे, कुणाला शाऴेला फी नाही अशा सर्वांसाठी साद घालणारा आणि धावून जाणारा फक्त आणि फक्त पत्रकार असतो. तो अख्या गावाची, समाजाची धूणी धुत असतो. त्याच्यामुऴेच समाजाच्या सर्व स्तरातील चांगल्या वाईट-घटना समोर येतात. पण इतकं सगऴं करूनही त्याच्याबद्दल आत्मियता कुणालाच नसते. त्याच्या वेऴेसाठी कितीजण धावतात ? हा संशोधनाचा विषय आहे.

समाजात कुठे अन्याय झाला, दडपशाही झाली सर्वप्रथम धावून जातो पत्रकारच. समाजातले अन्याय-अत्याचार चव्हाट्यावर मांडणारा, त्यासाठी भांडणारा पत्रकारच असतो. दुबऴ्यांचे तो बऴ होतो, दिनांचा साथी होतो, दबलेल्यांचा आवाज होतो. पिचलेल्यांचा आधार होतो. समाजातल्या प्रत्येक घटकांचा आवाज होणारा पत्रकार मात्र एकाकी असतो. त्याच्या वाट्याला फक्त आणि फक्त शिव्याच असतात. त्याने कुणाची बाजू घेतली तरी शिव्या आणि नाही घेतली तरी शिव्या. त्याने लबाडी केली तरी शिव्या आणि त्याने सत्याची साथ केली तरी शिव्याच त्याच्या वाट्याला येतात. गेल्या सत्तर वर्षात शेकडो पत्रकारांना जिवानिशी मरावे लागले आहे पण त्याच्यासाठी कोण मेणबत्त्या पेटवतो ?त्याच्यासाठी कोण अश्रू गाऴतो ? कोरोनाच्या संकटात काम करणार्या आरोग्य व पोलिस कर्मचार्यांसाठी टाऴ्या आणि थाऴ्या वाजवल्या. या बांधवांच्यासोबत पत्रकारही जीवावर उदार होवून काम करतायत. त्यांच्यासाठीही दोन-चार टाऴ्या वाजवा. ते जेव्हा बातमीच्या मागे धावता धावता मरतात, नालायक राज्यकर्त्यांची किंवा गुंडांची शिकार होतात तेव्हा त्याच्यासाठी तुमच्या डोऴ्यातून दोन आसवांचे थेंब सांडा. कारण तोच तुमचे कान व डोऴे असतो. त्याच्याशिवाय समाज म्हणून तुम्ही कर्णबधीर, मुकबधीर आणि अंध आहात याचे भान ठेवा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button