चिऊ ये दाणा खा पाणी पी अन् भुर्रकन उडून जा
पक्षी वाचवण्यासाठी चांप्याच्या सरपंचाचा कौतुकास्पद उपक्रम
(अनिल पवार)
मे महिन्यात प्यायला पाणी मिळत नसल्याने अनेक दुर्मीळ पक्षी मृत पावतात. यामुळे चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी पुढाकार घेत परिसरातील झाडांवर पाणपोई बसविल्या आहेत. सरपंच पवार यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पक्ष्यांसाठी दाणापाण्यासाठी रिकाम्या तेलाच्या पिंपापासून परळ तयार केले. हे परळ दाणापाण्याने भरण्यात येतात.
चांपा : पक्षांच्या दाणापाण्यासाठी झाडांवर परळ लटकविताना सरपंच आतीश पवार.
चांपा (जि.नागपूर) ता ३० : नागपुरात दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढलेली आहे. त्यातच पक्षांची जगण्याची धडपड तीव्र होताना दिसते. अशावेळी वाढत्या तापमानांमुळे पक्ष्यांना दाणापाणी मिळत नसल्याने अनेकदा पक्षी मृत पावण्याच्या घटना घडतात. म्हणूनच या पक्षांना जीवदान मिळावे. तसेच गावकऱ्यांमध्ये पक्षांबद्दल ओढ निर्माण व्हावी, याकरिता चांप्याचे सरपंच अतिश पवार हे पक्षांना दाणापाणी देण्याचा उपक्रम राबवीत आहेत.
“पाणी मिळणे कठीण
नागपुरात यंदा मे महिना सुरू झाल्यानंतर सातत्याने तापमानाचा पारा वाढत आहे. अंगाची अक्षरशः लाही-लाही होत आहे. दिवसेंदिवस तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होत आहे. हवामान विभागातर्फे विदर्भात “ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. उष्णता वाढल्याने जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन भूगर्भातील जलपातळी खोलवर जाते. पर्यायानं उन्हाळ्यात पशुपक्ष्यांचे काय, तर माणसांनाही पाणी मिळणे कठीण होते.
झाडांवर बसविल्या पाणपोई
मे महिन्यात प्यायला पाणी मिळत नसल्याने अनेक दुर्मीळ पक्षी मृत पावतात. यामुळे चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी पुढाकार घेत परिसरातील झाडांवर पाणपोई बसविल्या आहेत. सरपंच पवार यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पक्ष्यांसाठी दाणापाण्यासाठी रिकाम्या तेलाच्या पिंपापासून परळ तयार केले. हे परळ दाणापाण्याने भरण्यात येतात. त्यासाठीचे नियोजनदेखील ग्रामपंचायतीने केले आहे. याकडे आकर्षित होऊन विविध जातींचे, रंगाचे पक्षी येथे यायला लागले आहेत. ग्रामपंचातीमार्फत ग्रामपंचायत कार्यालय, शाळेत व प्रभाग क्रमांक एक दोन व तीनमध्ये सार्वजनिक जागेवरील झाडांवर परळ लावल्याने विविध पक्षी पाणी प्यायला येतील आणि ते आम्हाला पाहायला मिळतील, अशी प्रतिक्रिया सरपंच अतिश पवार यांनी व्यक्त केली.
प्रत्येक ग्रामपंचायतींनी पक्षांसाठी व्यवस्था करावी
गाव व शहरात सिमेंटचे जंगल वाढत असल्याने झाडांची संख्या दिवसेंदिवस घटतेय. त्यामुळं पक्षांची निवासस्थाने धोक्यात आलीय. हे सगळे बदलायचे असेल, तर प्रत्येकाने पक्षांसाठी दाणा-पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. तालुक्यांतील प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात दाणापाण्याची व्यवस्था करावी.
आतिश पवार
सरपंच, चांपा






