५ डिसेंबर गौरव दिन /अभिमान दिन’ निमित्ताने वंसतरावजी नाईक साहेब आणि आंदोलने
विनोद जाधव मुंबई.
Mumbai : आदरणीय वसंतरावजी नाईकसाहेबांच्या १९६३ ते १९७५ या सव्वाअकरा वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एक गोष्ट जाणवते की, या काळात विरोधी पक्षाने प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाने, सोबतच विदर्भात श्री जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने आणि मुंबईत समाजवादी महिला आघाडीने, ‘महागाई प्रतिकार समिती’ने जी आंदोलने केली, तशी आंदोलने नंतरच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांसमोर कधीच झाली नाहीत. श्री मारोतराव कन्नमवारसाहेबांच्या छोट्या कारकिर्दीत कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेला मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांचा एक अटीतटीचा प्रसंग सोडला तर (जो संप कन्नमवारसाहेबांनी मोडून काढला) महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला वसंतरावजी नाईक साहेबांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाएवढ्या प्रखर आंदोलनाला कधीच तोंड द्यावे लागले नव्हते संकरीत ज्वारी हायब्रीड चा प्रचार प्रसार
नाईक साहेबांच्या कार्यकाळात राजकीय परिस्थितीही प्रतिकूल होती, वातावरण तप्त होते, विरोधी पक्ष संख्येने कमी होता मात्र आक्रमक होता. विरोधी पक्षात गुणवत्ता होती, विश्वासार्हताही होती, सत्व होते, चारित्रही होते, त्यामुळे उद्धवराव पाटील असोत, कृष्णराव धुळप असोत, मृणालताई गोरे असोत की विदर्भात जांबुवंतराव धोटे असोत, दैनिक ‘मराठा’चा ‘कडाडणारा चाबुक’ आचार्य अत्रे यांच्या रुपाने असो, की तापलेला बेळगाव-कारवार सीमाप्रश्न असो, सेनापती बापट, उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, आचार्य अत्रे, मधु दंडवते, कृष्णराव धुळप, कॉ. बर्धन, रामभाऊ म्हाळगी, दत्ता देशमुख किती नावे सांगावीत आणि किती नेते सांगावेत ! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतीचे, पाण्याचे, दुष्काळाच्या विरोधातले, मुंबईत गिरणी कामगारांचे, महागाई प्रतिकार समितीच्या महिलांचे अशी चारही बाजूने चौफेर आंदोलने चालू होती. ५ रुपयांचे गोडतेल ७ रुपये किलो झाले तर वसंतरावजी नाईकसाहेबांच्या मंत्रालयाच्या दारात शेकडो महिला लाटणे घेऊन फतकल मारुन बसल्या. मात्र जानेवारी २०११ मध्ये तूरदाळ शंभर रुपये किलो झाली, लसुन दोनशे रुपये किलो झाली मात्र आंदोलनाचा एक टीचभर सुद्धा आवाज कुठे ऐकू आला नाही ! वसंतरावजी नाईक साहेबांच्या काळात झालेले सगळे प्रखर आंदोलन त्यांनी अतिशय शांतपणे स्वीकारले. त्याचा प्रतिवाद केला नाही. परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून काम केले. महाराष्ट्राला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. “अन्नधान्याच्या आघाडीवर महाराष्ट्राला स्वावलंबी केले नाही तर मला फासावर द्या”, अशी शिवाजी महाराज पार्कच्या सभेत त्यांनी घोषणा केली. शेतकऱ्यांना कामाला लावले, संकरित ज्वारीचा प्रचार करून उत्पन्न वाढविण्यासाठी आत्मविश्वास निर्माण केला. या देशातील जनतेला खाण्यासाठी अमेरिकेतून ‘मिलो’ हा गहू येत होता. तो गहू अमेरिकेत गुरांना खायला घालत असत. त्यानंतर ‘पी. एल-८४’ हाही त्याच स्वरूपाचा गहू अमेरिकेतून आयात करावा लागत होता. अन्नधान्यातील हि परावलंबिता नाईकसाहेबांना सहन झाली नाही. त्यामुळे संकरित ज्वारीचे बियाणे शेतकऱ्यांनी स्वीकारावे, हा आग्रह त्यांनी अगदी सर्व स्तरांतून, सर्व क्षेत्रांतून, सर्व सभांतून धरला. ज्वारीच्या नियमित बियाण्याने एकरी दोन पोती ज्वारी निघत होती. स्वावलंबी व्हायचे असेल तर अधिक उत्पादन देणारे ‘संकरित वाण’ स्वीकारणे आवश्यक होते. या संकरित ज्वारी बियाण्याच्या विरोधात विरोधी पक्षाने असा अघोरी प्रचार केला की, ‘ही ज्वारी खाल्ली तर ‘वंध्यत्व’ येते’, इथपर्यंत अपप्रचार झाला. पण जेव्हा एकरी दहा पोती ज्वारी निघू लागली आणि त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही हे स्पष्ट झाले तेंव्हा नाईकसाहेबांच्या अथक श्रमांचे चीज झाले.






