Nandurbar

जिल्ह्यात अडकलेले दोन हजार बिहारी नागरीक रेल्वेने गावाकडे रवाना शासन आणि प्रशासनाचे मानले आभार

जिल्ह्यात अडकलेले दोन हजार बिहारी नागरीक रेल्वेने गावाकडे रवाना
शासन आणि प्रशासनाचे मानले आभार

फहिम शेख

नंदुरबार दि.5 : लॉकडाऊनमुळे नंदुरबार जिल्ह्यात अडकलेल्या 2014 बिहारी नागरिकांना दोन विशेष रेल्वेने बिहारला पाठविण्यात आले. यात दरभंगा येथील 992 आणि सहरसा येथील 1022 नागरिकांचा समावेश आहे. सुखरुप गावाकडे जायला मिळत असल्याने या सर्वांनी शासन आणि प्रशासनाला धन्यवाद दिले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मंडळ रेल्वे प्रबंधक जीव्हीएल सत्यकुमार, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा आदी उपस्थित होते.

कोविड-19 प्रतिबंधासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बिहार येथील काही मजूर आणि जामीय संकुलातील विद्यार्थी जिल्ह्यात अडकले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर या नागरिकांकडून घरी जाण्याची मागणी करण्यात येत असल्याने पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बिहारच्या सचिवांशी संपर्क साधून या नागरिकांना स्विकारण्याची विनंती केली.

याबाबत गेल्या 15 दिवसापासून पाठपुरावा सुरू होता. मुंबई येथील नियंत्रण कक्षाचेदेखील सहकार्य घेण्यात आले. या सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिहार येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर बिहार प्रशासनाने मजूर आणि विद्यार्थ्यांना स्विकारण्यास सहमती दर्शविली. श्रमीक एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर रेल्वे विभागाशी प्रशासनाने संपर्क साधला व रेल्वेद्वारे बिहारमधील नागरिकांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुपारी दोनच्या सुमारास दोन्ही रेल्वे नंदुरबार स्थानकात दाखल झाल्या. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून नायब तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यातील नागरिकांशी समन्वय साधला. सर्व प्रवाशांची नोंद घेण्यात आल्यानंतर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून या प्रवाशांना रेल्वेत बसविण्यात आले. सायंकाळी साडेतीन व चार वाजता या रेल्वे गाड्या सेाडण्यात आल्या.

यावेळी श्री.पंडीत आणि श्री.गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत रेल्वेत बसविण्यात आले. तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्ष सुनिल नंदवाळकर यांनी रेल्वे स्थानक परिसरातील सर्व व्यवस्थेचे नियेाजन केले. गर्दी आणि गोंधळ होऊ न देता आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

रेल्वे विभागानेदेखील गाड्या सॅनिटाईझ करणे व रेल्वे स्थानकावर फवारणीची उत्तम व्यवस्था केली होती. प्रवाशांना मास्कचे वाटपदेखील यावेळी करण्यात आले. जामिया संकुलातर्फे पिण्याचे पाणी आणि मास्क उपलब्ध करून दिले. गावी जायला मिळत असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाने जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.

जामिया संकुलाचे मौलवी हुजैफा, मौलवी ओवैस वस्तानवी, मुख्याध्यापक रुीक जहागिरदार, मौलाना जावेद पटेल, अखलाख शेख आदी यावेळी उपस्थित होते.
पुर्णिया येथील 1245 आणि अरेरिया येथील 1213 नागरिकांना गावाकडे पाठविण्यासाठीदेखील विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात येणार आहे. लवकरच या रेल्वेगाड्यादेखील सोडण्यात येतील.

ॲड.के.सी. पाडवी, पालकमंत्री-आज साधारण दोन हजार व्यक्ती सुखरुप आपल्या गावाकडे जात आहेत आणि त्यांना कुटुंबाशी भेटण्याचा आनंद मिळणार आहे याचे पालकमंत्री म्हणून समाधान आहे. सर्वांची चांगली व्यवस्था आपण जिल्ह्यात केली होती. त्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी शासनानेदेखील बिहार प्रशासनाशी चांगला संपर्क साधला. बाहेरच्या राज्यातील व्यक्तींना सुखरूप जाता यावे आणि आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित गावी येता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी-लॉकडाऊन वाढल्यामुळे गावाकडे जाण्याचा नागरिकांचा आग्रह होता.. बिहार प्रशासनाने सहकार्याची भूमीका दाखविल्याने व रेल्वेनेदेखील तातडीने सहकार्य केल्यामुळे या नागरिकांना त्यांच्या गावी पाठविणे शक्य झाले आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद संपुर्ण टीमचा उत्साह वाढविणारा आहे. आपत्ती व्यवस्थापन कार्यात असे काही माणूसकीचे क्षण कायम स्मरणात राहतात.

मौलाना गुलाम वस्तानवी, जामीया संकुलाचे अध्यक्ष-पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, खासदार डॉ.हिना गावीत आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे चांगले सहकार्य लाभले. त्यामुळेच संकुलातील मुले सुखरुप आपापल्या गावी जात आहेत. याचा मनापासून आनंद आहे. चांगल्या समन्वयातून हे शक्य झाले आहे.

क्षणचित्रे-
• पालकमंत्र्यांकडून दूरध्वनीद्वारे व्यवस्थेचा आढावा
• पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रवाशांना गाडीत बसविले.
• अत्यंत शांततेत आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
• महसूल, रेल्वे, पोलीस, जामीया संकुल प्रशासन यात उत्तम समन्वय.
• जामीया संकुलातील मुलांमध्ये घरी जाण्याबद्दल विशेष उत्साह
• फलाटावर सातत्याने फवारणी
• स्वत: पोलीस अधीक्षक रेल्वे प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे व मास्क घालण्याचे आवाहन करीत होते.
• रेल्वे पोलीसांचे चांगले सहकार्य
• सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी रेल्वेपर्यंतच्या मार्गावर चिन्हांकन
00000

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button