विद्यार्थ्यांनी ज्ञानसंपन्न होऊन विकास साधावा
चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
“तंत्रज्ञानाच्या जलद गतीने होणाऱ्या प्रसारामुळे आजचा विद्यार्थी सुदैवी असून तो माहितीसंपन्न होत आहे, म्हणूनच जगात सर्वत्र स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा स्पर्धेच्या वातावरणात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वंकष ज्ञान प्राप्त करुन ज्ञानसंपन्न होऊन स्वतःसह आपल्या परिसराचा विकास साधावा”, असे आवाहन युवानेते मंगेश चव्हाण यांनी केले.
चाळीसगांव येथील हिरापूर रोडवरील ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय व ज्ञानदा बालक विद्या मंदिरात आज विद्यार्थ्यांना युवानेते मंगेश चव्हाण यांच्यातर्फे मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई चव्हाण, नगरसेविका सौ.विजया पवार, प्रभाकर चौधरी, सौ.योजना चव्हाण, सौ.कावेरी पाटील, सौ.रेखा जोशी, भास्कर पाटील, किशोर गवळी, खुशाल बिडे, सचिन आव्हाड, सौ.अनिता शर्मा, मुकेश गोसावी, प्रवीण मराठे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मंगेश चव्हाण यांनी सांगितले, की माझे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या समस्यांची मला चांगली जाण आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत बऱ्याच पालकांना शालेय साहित्य खरेदी करणे कठीण जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही करता येईल का या भावनेतून आपण गरीब विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. भारत महासत्ता होण्यासाठी विद्यार्थीच खरे आधारस्तम्भ आहेत. तेव्हा शिक्षणाची कास धरून विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करुन यशाची शिखरे पादाक्रांत करावी, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून पाण्याची टाकी भेट देण्यात आली. यानिमित्ताने पंढरपूर येथे गेलेल्या वारकऱ्यांकडून यवानेते मंगेश चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सुरवातीला वैशाली मोरे यांनी स्वागतगीत सादर केले. मुख्याध्यापिका सुनीता देवरे यांनी प्रास्ताविक केले. उज्ज्वला सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन तर संध्या फासे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांसह दप्तर मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले होते.







