Aurangabad

अखंड हरिनाम सप्ताह सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत – महंत रामगिरीजी महाराज

अखंड हरिनाम सप्ताह सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत – महंत रामगिरीजी महाराज

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : सराला बेटावर 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला आहे. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेटावर येत्या 12 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान पार पडणार्‍या सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे, मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत, सोशल डिस्टन्सिंग पाळून महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते दिप प्रज्वलित करून प्रारंभ करण्यात आला.

यावेळी श्री क्षेत्र सराला बेटावर मिरवणूक भजन मंडपात पोहचताच महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते अखंड यज्ञ प्रज्वलित करून ,सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रम्हलिन नारायणगिरीजी महाराजांसह सर्व संताच्या प्रतिमांचे पुजन करुन तसेच विणापुजन करुन पंचपदी गायनाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की, श्री क्षेत्र सराला बेटाचा सप्ताह गंगागिरीजी महाराज यांच्या सह ब्रम्हलिन नारायणगिरीजी महाराज आदींसह पाच महंत होऊन गेले. आमचे ही सप्ताहाचे तप वर्ष असुन सद्गुरूंच्या आशीर्वादाने आम्ही ही जबाबदारी पेलत आहोत. आपले कर्म चांगले असेल तर भगवंताची कृपा निश्चितच आपल्या वर राहील. कितीही प्रतिकुल परिस्थिती आली तरी भगवंताची भक्ती, भजन सोडू नये. निष्काम भक्ती करावी, सदगुरू गंगागिरीजी महाराज हे निष्काम कर्मयोगी व अलौकिक संत होते. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे यज्ञ असल्याचे महाराज म्हणाले.

अखंड हरिनाम हा तपस्या यज्ञच असुन गंगागिरीजी महाराज हे निष्काम सन्याशी होते, त्यांच्या परंपरेतील हे कार्य बेटाचे सेवक म्हणून आम्ही पुढे नेत आहोत, अहोरात्र अखंड भजन पाहील्यावर नक्कीच येथे पंढरीचा पांडुरंग व प्रतिपंढरी अवतरल्या शिवाय रहाणार नाही. फक्त भक्ती करताना ती निस्वार्थ अंतकरणाने केली पाहिजे. सद्गुरुंच्या कृपेने सप्ताह पार पडू दे व शेतकरी सुखी होऊ दे तसेच कोरोना महामारीचे संकट टळु दे अशी प्रार्थना याप्रसंगी महाराजांनी केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर बेटावर भाविकांना येण्यास मज्जाव केलेला आहे . सप्ताह काळातही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सप्ताह पार पडणार असल्याने भाविकांना सप्ताह स्थळी येता येणार नाही. परंतु आज करोनाच्या पार्श्वभूमीवर काही भाविक भक्त सोडले तर गर्दी करण्यास मनाई असल्याने या सोहळ्याला मर्यादित लोक उपस्थित होते. प्रशासन, पोलीस यंत्रणा उपस्थित होती. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचे स्प्रे दिसून येत होते. करोनामुळे सप्ताहाची परंपरा खंडित होते की काय? असा प्रश्न भाविकांमध्ये होता. परंतु महंत रामगिरी महाराज व सप्ताह समितीने चांगला निर्णय घेतल्याने भाविकांत समाधान आहे.

कोणत्याही भाविकांनी बेटावर येऊ नये. घरीच राहून सप्ताहाचा आनंद घ्यावा. यासाठी टीव्ही, मोबाईलवर व सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल. वृत्तपत्रात बातम्या येतील तशी सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रशासनच्यावतीने गोदावरी नदीच्या पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे या बेटावर कुणीही येऊ नये, या सप्ताहाच्या देणगितुन काही निधी रायगड, रत्नागिरी व अतीवृष्टीने बाधित जिल्हा साठी मुख्यमंत्री सहायता निधीकरीता देण्यात येईल असे आवाहन महंत रामगिरी महाराजांनी केले. यावेळी उपस्थित माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आण्णा साहेब पाटील म्हस्के, आमदार रमेश बोरणारे सर, सप्ताह समितीचे अध्यक्ष साबेरभाई खान, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, दिनेश परदेशी, विशाल शेट संचेती, मनाजी मिसाळ, बाबासाहेब जगताप, शिवाजी ठाकरे, सचिन जगताप, दत्तु पा खपके, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह बेटावरील महाराज मंडळी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button