विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा
आ.भारत भालके यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरांमधील विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. यासाठी शासनाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्याची विनंती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आ.भारत भालके यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे यांना देशभरातील जनता साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखते. एका साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणीतून दलित आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. सुमारे ३५ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह,एक प्रवास वर्णन, नाटक आणि पोवाडे अशी विपुल ग्रंथसंपदा अण्णा भाऊंनी निर्माण केली. जगभरातील २७ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याची भाषांतरे करण्यात आली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून दलितांच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. त्यांच्या समाजकार्याचा गौरव करण्यासाठी त्यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना या थोर समाजसुधारकाला ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी देशभरातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे,
याबाबत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठराव करून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशा मागणीचे पत्र ई-मेल द्वारे राज्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आले यावेळी आ.भारत भालके, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेशभाऊ यादव, शहराध्यक्ष किशोर खिलारे, मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दशरथ यादव, उपाध्यक्ष पंढरीनाथ कदम, ॲड. बादल यादव,नाथा यादव,लोकेश यादव , लहू रणदीवे, भास्कर कांबळे, खंडू कांबळे, उमेश कांबळे, रणजीत रणदीवे आदी उपस्थित होते.






