खाटीक समाजातील अफशाची गगनभरारी, समाजातील देशात पहिली पायलट होण्याचा मिळवला बहुमान
मुंबई : मुंबईतील भाईंदर येथील फारुक इस्माईल कुरेशी यांची कन्या आफशा ही नुकतीच अमेरिकेतून पायलटचे प्रशिक्षण पूर्ण करून हिंदुस्थानात आली आहे. अशी कामगिरी करणारी अफशा ही मुस्लिम खाटीक समाजातील देशातील पहिली कन्या असून, देशभरातील खाटीक समाजातून कुरेशी कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हिंदुस्थानातील आणि विशेषतः राज्यातल्या मुस्लिम खाटीक, कसाई, कुरेश, कुरेशी बांधवांना अभिमान वाटेल, अशी मोठी कामगिरी अफशाने केली आहे. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षण मुंबईतच घेतलेल्या अफशा यांनी इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशनची इंजिनीअरिंगची पदवी उच्चश्रेणीत संपादन केली आहे.
त्यानंतर तिने कमर्शियल पायलट लायसेन्सचा कोर्स अमेरिकेतून पूर्ण करून पायलट बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. परदेशी नोकरीची संधी मिळत असतानाही मातृभूमीत राहून देशसेवा करण्याच्या ध्यासाने अफशाने हिंदुस्थानात नोकरी करण्याची मानसिकता बाळगली आहे.
अफशाच्या देदीप्यमान यशाबद्दल तिच्यासह परिवारातील सर्वांचे, तिच्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते अफशाचा सत्कार करणार असल्याचे मुस्लिम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सादिक खाटीक यांनी सांगितले.
”अतिशय खडतर परिश्रमातून मिळालेल्या या देदीप्यमान यशात आई, वडील, आजी, भाऊ, बहीण, अन्य नातलग आणि प्रोत्साहन देणारे गुरुजन यांचा मोठा वाटा असला, तरी वडिलांनी दाखविलेला प्रचंड विश्वास, दिलेले प्रोत्साहन आणि प्रेम मला या यशापर्यंत नेण्यास उपयुक्त ठरले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यात सुप्त गुण असतातच. प्रत्येकाने आत्मविश्वास, निष्ठा, परिश्रम, ध्येयाने प्रेरित होऊन वाटचाल केल्यास प्रत्येकजण त्याच्या क्षेत्रात अव्वल कामगिरी करू शकतो. सकारात्मक भूमिका, असेल त्या परिस्थितीतून जिद्दीने कष्ट घेतल्यास ते हमखास यशाचे मानकरी बनू शकतात.”






