आशा सेविकांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा- राजु देसले याची मागणी.
प्रतिनिधी शांताराम दुनबळे
करोना संकटकाळात घराबाहेर पडून काम करणाऱ्या जिल्ह्यातील आशा , गट प्रवर्तकांवरील वाढत्या हल्ल्यांचा महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे . संशयितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष राजू देसले यांनी केली आहे . जिल्ह्यातील आशा आणि गट प्रवर्तक आरोग्य विभाग करोनाकाळात खंबीरपणे काम करत आहेत .
असे असतानाही त्यांच्यावर हल्ले होत आहेत . नांदगाव तालुक्यातील मळगाव येथे उपसरपंचाचा पती ज्ञानदेव आहेर आणि त्याचा मुलगा भाऊसाहेब यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या गट प्रवर्तक रोहिणी आहेर यांना मारहाण करण्याचा प्रकार केला . घटनेचा आयटक संलग्न आशा आणि गट प्रवर्तक संघटना निषेध करत असल्याचे देसले यांनी म्हटले आहे .ज्ञानदेव यांच्या पत्नीचे उपसरपंचपद त्वरित रद्द करण्यात यावे , अशी मागणीही करण्यात आली आहे . जिल्ह्यात आशा आणि गट प्रवर्तकांवर होणाऱ्या हल्ल्यांची प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे .
गावपातळीवर करोना प्रतिबंधक समितीत सहभागी सर्व सर्वेक्षणासाठी कार्यरत आहेत . अशा घटनेमुळे आशा सेविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे . अधिकारी वर्गाच्या दबावामुळे काही आशा सेविका तणावात काम करत आहेत . नाशिक शहरातील एका आशा सेविकेला ताणतणावामुळे अर्धांगवायू झाल्याचा उल्लेख करून याची प्रशासनाने दखल घ्यावी , अशी मागणी देसले यांनी केली आहे . करोनाकाळात आशा सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत . ताप , खोकला आहे काय , घसा दुखतो का , अशी सर्व माहिती घेत आता तर ताप आणि ऑक्सिजनही त्यांना मोजावा लागत आहे .
थर्मामीटर , ऑक्सिमीटरमुळे रुग्णांना स्पर्श करावा लागतो . त्यामुळे आशा सेविकांनाही संसर्गाची भीती वाटते . आशा सेविका मिळत असलेल्या संरक्षण साहित्यासह जिवावर उदार होऊन ग्रामीण , शहरी भागांत सेवा देत आहेत . एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या सर्वेकामासाठी केंद्र सरकारचे एक हजार रुपये दरमहा मिळाले . महाराष्ट्र शासनाने फक्त ग्रामीण भागात कार्यरत आशा सेविकांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता एकदाच दिला आहे .
शहरी आशा सेविकांना प्रोत्साहनपर भत्ता मिळाला नाही . राज्यातील उल्हासनगर मनपाने १० हजार रुपये , मुंबई , पुणे , वसई , विरार येथे ३०० रुपये रोज सर्वेक्षणासाठी दिला जातो . नाशिक येथेही आशा सेविकांना सर्वेक्षणासाठी ३०० रुपये मोबदला प्रतिदिन द्यावा , आदी मागण्या करण्यात आल्या . करोनायोद्धा असलेल्या आशा , अंगणवाडी सेविकांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी देसले यांनी केली आहे .






