मका खरेदीची मर्यादा वाढवून द्यावी: खा.डॉ.भारती पवार
प्रतिनिधी विजय कानडे
केंद्र शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजनेच्या माध्यमातून मका खरेदी करण्यात आली असताना केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी 25000 मेट्रिक टन मका खरेदी करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार मका खरेदीचे उद्दिष्ट देखील पूर्ण करण्यात आले आहे. परंतु अद्यापही नासिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचा मका भरपूर प्रमाणात शिल्लक असून तो विक्री अभावी तसाच पडून आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाळा तोंडावर असतांना मका साठवणूक करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. लवकरच उर्वरीत मका खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. त्याकरीता केंद्र सरकारने मका खरेदी करण्याची मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचेकडे पत्राद्वारे करून ह्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेशी भ्रमणध्वनी वरून चर्चा देखील करण्यात आली आहे.
राज्य शासनानेही केंद्राकडे तशी रीतसर मागणी करणे गरजेचे असून महाराष्ट्र राज्याने तातडीने केंद्राकडे वाढीव मका खरेदी करण्यासाठी मागणी पत्र द्यावे यासाठीही खा.डॉ.भारती पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे.






