महाराष्ट्र सरकारच्या विरोधात चिमूर येथे निषेध आंदोलन,उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत अवाढव्य आलेल्या विजबिलाची जाळून केली होळी
प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
कोरोणासारख्या जागतिक महामारीच्या संकटात संपूर्ण देशभर टाळेबंदी घोषित आहे. त्यामुळे मागिल काही महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने ग्राहकांकडे अवाढव्य वीज बिलाची मागणी केली आहे. त्यामुळे हे वीज बिल संपूर्णतः माफ करण्यात यावे. आणि एप्रिल २०२० पासून केलेली विजेची दरवाढ मागे घेण्यात या करिता आज चिमूर येथे भारतीय जनता जनता पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी केले असून भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय चिमूर येथे अवाढव्य आलेल्या विजबिलाची जाळून होळी करून महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध नोंदविला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत चौदा हजारापेक्षा जास्त लाभार्थी आहेत. या योजनेचा निधी लाभार्थ्यांना न मिळाल्यामुळे सदर नागरिक अडचणीत आले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून घरावर छत नसल्याने लाभार्थी अडचणीत आलेले आहेत त्यामुळे तो निधी सुध्दा तातडीने देण्यात ही मागणी सुद्धा आंदोलनात केली आहे.
शासनाने कर्जमाफी जाहीर केली, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे, शिवाय अनेक शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठन सुध्दा झालेले नाही. त्यामुळे हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिकदृष्टया हवालदिल झालेला आहे. या आर्थीक संकटातुन शेतकऱ्याला बाहेर काढण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना युरीया व संबंधित खते तातडीने उपलब्ध करून द्यावे.
टाळेबंदीत अनेकांचा रोजगार गेला, हातावर पोट घेवून जगणार्यांसमोर उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली. त्यामुळे बारा बलुतेदार व गोरगरीबांना राज्य सरकारतर्फे पॅकेज देण्यात यावे.
अशा सबंध समस्यांकडे निद्रीस्त असलेल्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी चिमूर तालुक्याच्या वतीने चिमूर महाविकासआघाडी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे.भारतीय जनता पार्टी चिमूर तालुक्याच्या वतीने आमदार बंटी भांगडीया यांचे नेतृत्वात महाराष्ट्र राज्याच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
या वेळी भाजपा जेष्ठ नेते वसंत वारजुकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामजी हटवादे,जिल्हापरिषद उपाध्यक्षा सौ.रेखाताई कारेकर,छायाताई कंचलावार,बकाराम मालोदे,राजू देवतळे,पंचायत समिती सदस्य पुंडलिक मत्ते,प्रदीप कामडी,समीर राचलवार,किशोर मुंगले ,नितीन गभने,विवेक कापसे, मनीष तुंपल्लीवार,संजय कुंभारे,मायाताई नंनांवरे,सचिन फारकाडे,विलास कोराम, सतीश जाधव,जयंत गौरकर, टीमु बलदुवा उपस्थित होते सोशल डिस्टनस नियमांचे पालन करत आंदोलन करण्यात आले.






