सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करा- डॉ.राजेंद्र भारुड
फहिम शेख
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.21: कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी येणारा गणेशोत्सव, मोहरम तसेच इमाम बादशाहा ऊरुस साध्या पद्धतीने साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
बैठकीस पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप विभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, नगर पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी डॉ. भारुड म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सुचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांचे पालन मंडळांनी करावे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. सण-उत्सवाच्या काळात अनावश्यक गर्दी करु नये, मास्क व सॅनीटायझरचा वापर करावा.
गणपती मंडळांनी निर्जुंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. वीज वितरण कंपनीने उत्सवकाळात अंखड वीज पुरवठा सुरु राहील यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर खड्डे पडले असतील त्याठिकाणी भराव करुन दुरुस्तीची कामे करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
श्री.पंडीत म्हणाले, शासनाच्या मार्गदशक सुचनांचे पालन करुन येणारा गणेशोत्सव साधेपणाने, सुरक्षित व संयमाने साजरा करावा. सार्वजनिक गणेशमुर्तीची उंची 4 फुट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादेत असावी. पुजा व आरतीसाठी 5 पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या ठिकाणी गर्दी करु नये. नोंदणीकृत व अनोंदणीकृत तसेच खाजगी मंडळानी विसर्जनाची माहिती कळवावी. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गणेशमुर्तीच्या विसर्जनासाठी नंदुरबार येथे 4 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहे. तसेच निर्माल्य व मुर्तीचे संकलन करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती श्री.शिंदे यांनी दिली.






