Chalisgaon

प्रभाग क्र.१ मध्ये  प्रभागात नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविणे, मुलभूत गरजा पुरविणे हे कर्तव्य

प्रभाग क्र.१ मध्ये प्रभागात नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविणे, मुलभूत गरजा पुरविणे हे कर्तव्य

मनोज भोसले

मी घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील, गेल्या 3 वर्षांपासून नगरपालिका, चाळीसगाव प्रभाग क्र.१ मध्ये नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करतो. या प्रभागात नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविणे, मुलभूत गरजा पुरविणे हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.

सर्वांच्या निदर्शनास आणू इच्छितो, माझा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या शहरातील सर्वात मोठा प्रभाग आहे. डेराबर्डी औद्योगिक वसाहत पासून ते अयोध्या नगर रेल्वे लाईन पर्यंत, धुळे मालेगाव रोड मधील संपूर्ण परिसरासह मालेगाव रोड लगतचे रामकृष्ण नगर, वृंदावन नगर, राखुंडे नगर पर्यंत हा प्रभाग पसरलेला आहे.

अशी सर्व परिस्थिती असताना आपण जाणतात की चाळीसगाव नगरपालिका मध्ये गेली अनेक दशके एकाच कुटुंबाच्या अधिपत्याखाली एकाच आघाडीची सत्ता होती. साहजिकच नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेत जे काही अधिकारी – कर्मचारी हे कार्यरत आहेत त्यापैकी अनेक जण स्थानिक स्वराज्य संस्थेत बदली होत नसल्याने तेच ते कर्मचारी अनेक वर्षे आताचे विरोधी गटनेते व तत्कालीन सत्ताधारी कुटुंबाच्याच नियंत्रणात होते. साहजिकच त्यांच्यावर नियंत्रण म्हणा किंवा दबाव म्हणा या कुटुंबाचा आजवर राहिला आहे हे सर्व शहराला माहिती आहे.

फक्त आणि फक्त चाळीसगाव नगरपालिकेतील अनेक दशक नगरपालिकेत आपली सत्ता गाजविणारे आताचे विरोधी गटनेते यांच्या प्रेमापोटी काही निष्क्रिय अधिकारी व कर्मचारी हे माझ्यासारख्या अनेक नगरसेवकांना विकासकामांच्या बाबतीत दिरंगाई करण्याचे काम करत असल्याचा माझा आरोप आहे. कारण यांच्या मागील कारकिर्दीतील अनेक चुकीच्या गोष्टी, जनतेच्या पैश्याचा झालेला अपव्यय या बाबी आम्ही उघडकीस आणत असल्याने विरोधकांकडून काही मुठभर कर्मचार्‍यांना हाताशी धरून विकासकामांना अडथळे निर्माण करण्याचे काम सातत्याने करत असतात.

माझ्या प्रभागात नागरिकांचा रोष कसा वाढेल याची काळजी हे अधिकारी – कर्मचारी घेत असतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझा प्रभाग हा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे. प्रभाग क्र.1 मधील त्यामागील काळातील चुकीचे नियोजनामुळे हा प्रभाग अनेक समस्यांना आजही तोंड देत आहे.

उदाहरण म्हणून एक बाब आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, माझ्या प्रभागात नवीन वसाहत मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाच्या धोरणाप्रमाणे येथील लेआउट्स ला मंजुरी देताना त्यांना मूलभूत सुविधा पुरविणे, तो लेआउट विकसित करणे गरजेचे होते. ते विकसित न केल्यास त्यापोटी नगरपालिका त्या लेआऊट मधील प्लॉट अथवा त्याला लागणारी रक्कम नगरपालिका कडे शासनाच्या नियमानुसार डिपोझीट करावी लागते व त्यानंतर तो लेआऊट डीमार्क करून ते प्लॉट विक्री होतात. परंतु शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मागील काळात शहर विकास आघाडीचे गटनेते यांच्याच कार्यकाळात नियमबाह्य पद्धतीने व आर्थिक प्रेमापोटी रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे, त्या लेआउट मधील ओपन स्पेस विकसित करणे आदी मुलभूत सुविधा न पुरविता अनेक लेआउट्स ला मंजुऱ्या दिल्या गेल्या. त्याचे परीणाम ज्यांनी ते प्लॉट विकत घेतले त्यांना या मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच हा विकासकामांचा सर्व भार साहजिकपणे नगरपालिकेवर पडत आहे. आज विरोधकांच्या सूडबुद्धीच्या राजकारणापायी जाणूनबुजून प्रभागाला विकासकामांपासून वंचित ठेवण्यात येत आहे.

यांच्या द्वेषाच्या राजकारणाचे एक उदाहरण द्यायचे म्हटले तर माझ्या प्रभाग क्र.१ या एव्हड्या मोठ्या प्रभागाला सुविधा पुरवत असताना विरोधकांनी त्यांच्या निकटवर्तीय मुरुमचे ठेकेदार (जो राष्ट्रवादी चा कार्यकर्ता आहे) व त्यांच्या दहशतीत राहणाऱ्या अधिकारी – कर्मचार्‍यांच्या संगनमताने माझ्या प्रभागात जाणीवपूर्वक अतिशय कमी प्रमाणात मुरूम पुरवठा करण्यात आला.

मी नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत वेळोवेळी यासंदर्भात मुद्दा मांडल्यावर मा. नगराध्यक्षा सौ.आशालताताई चव्हाण व मुख्याधिकारी विकास नवाळे साहेब यांच्या सुचनेनंतर सुद्धा फक्त जाणीवपूर्वक अधिकारी – कर्मचारी यांच्यावर दबाव टाकून नवीन मुरूम टाकू देण्याची तरतूद करण्यात आली नाही. परिणामस्वरूप माझ्या प्रभागात चिखलाने अनेक विद्यार्थी, वयोवृध्द, महिला आदींचे छोटे मोठे अपघात सातत्याने घडत आहेत व लांबलेल्या अवकाळी पावसामुळे आजसुद्धा प्रभागातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

काही अधिकारी – कर्मचारी व विरोधकांच्या अभद्र युतीमुळे आज स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जर यांनी यापूर्वी आवश्यकतेनुसार अतितातडीचे व गरजेच्या काळात अत्यावश्यक उपाययोजना कराव्या लागतात हे माहिती असताना देखील अश्या कामांना विलंब कसा होईल याचे षडयंत्र रचले जाते.

यासारखी अनेक उदाहरणे असून केवळ विरोधी गटनेते यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचार व अनागोंदी कारभारावर मी आवाज उचलत असल्याने मुद्दामहून मला व माझ्या प्रभागाला टार्गेट करण्यात येत असल्याचा माझा आरोप आहे. यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक उदाहरणे व त्याचे पुरावे माझ्याकडे असून त्याबाबत मी हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. 70 रूपयांची वस्तू ही 750 + टॅक्स मध्ये खरेदी करण्याचा लुटमारीचा प्रकार शहर विकास आघाडीच्या कार्यकाळात झाला असून येणाऱ्या काळात मी यांनी ठेकेदाराला हाताशी देऊन लोकांच्या कष्टाच्या करातून नगरपालिकेत जमा होणाऱ्या पैश्याचा अपव्यय व गैरवापर स्वतःच्या स्वार्थासाठी कसा केला हे सिद्ध करणार आहे.

विरोधी आघाडीचे गटनेते यांचे लागेबांधे व हितसंबंध नगरपालिकेच्या माध्यमातून कसे जोपासले जातात याचे नुकतेच घडलेले ताजे उदाहरण म्हणजे चाळीसगाव शहरातील मोक्याच्या ठिकाणी बसस्थानक जवळ विना परवानगी अनधिकृत पणे 3 मजली कमर्शियल शॉपिंग कॉम्प्लेक्स चे काम सुरू आहे. सदर कॉम्प्लेक्स ला परवानगी नसताना 3 मजल्यांच्या स्लॅब पर्यंत काम सुरू आहे. कामाची सुरुवात झाली तेव्हापासून काही नगरसेवक यांच्या तक्रारी या कामाबाबत असताना तसेच सदर जागेवर अतिक्रमण सारख्या गंभीर प्रकाराच्या नोटिसा नगरपालिकेने बजावलेल्या असताना नियमानुसार काम थांबविणे गरजेचे होते. इमारतीचा फायनल प्लॅन मंजूर झाल्याशिवाय काम सुरू करता येत नसताना देखील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने सदर काम नियमबाह्य पद्धतीने सुरूच ठेवत परवानगी मिळण्यापूर्वीच 3 ऱ्या मजल्यापर्यंत काम गेले आहे.

नगरपालिकेतील काही कर्मचारी 3 – 3 महिने अनुपस्थित राहतात, काही अधिकारी 2 महिने फोन उचलत नाही असे अनेक गंभीर प्रकार नगरपालिका मध्ये घडत असतात, तेथील काही कर्मचारी हे चीफ ऑफिसर यांची दिशाभूल करून विरोधी पक्षाचे गटनेते यांच्याशी हितसंबंध असलेल्या ठराविक कर्मचारी यांना राजेशाही वागणुक व प्रामाणिक कर्मचाऱ्यांना जास्तीचे कामे सांगून त्रास दिला जातो.

३ वर्षापूर्वी शहर वासीयांच्या आशिर्वादाने नगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नामदार गिरीशभाऊ महाजन व खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी नगरपालिकेला मिळाला आहे मात्र यातही वेळोवेळी आडकाठी आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. या सर्व बाबी शहरवासियांना अवगत आहेत. राज्याच्या निधीतून अनेक कामांना १ वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती मात्र आजही निव्वळ दफ्तर दिरंगाई मुळे हि कामे सुरु होऊ शकली नाहीत.

शहरातील प्रत्येक प्रभागात एक ओपन स्पेस विकसित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती मात्र या कामांच्या तांत्रिक मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे भरावी लागणारी टीएसची रक्कम ४ महिन्यांपासून न भरल्याने हेदेखील काम खोळंबले आहे. केवळ विधानसभा निवडणुकीत या विकासकामांचा सत्ताधारी पक्षाला फायदा होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक हा विलंब केला गेला आहे.

आज माझ्या प्रभागातील व शहरातील विकासकामांना होत असलेली आडकाठी पाहता अश्या प्रकारे सूडबुद्धीने विरोधकांशी संगनमत करणाऱ्या काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचा निषेध करत मी माझा नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे. येणाऱ्या काळात जरी मी पदावर नसलो तरी या भ्रष्टाचार व चुकीच्या प्रवृत्ती विरोधात माझा संघर्ष सुरूच ठेवणार असून अनेक प्रकरणे जनतेपुढे आणणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button