Amalner: अमळनेर येथे बैल बाजारा बद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती ची उदासीनता.. बैल बाजाराची शेतकऱ्यांना प्रतीक्षा..
अमळनेर पावसाळा सुरू झाला आहे आणि शेतकरी बांधवांची शेतीच्या मशागतीची कामे देखील सुरू झाली आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीची तयारी करण्यात शेतकरी राजा मग्न झाला आहे.खरीपाच्या तोंडावर अन् मशागतीला सुरुवात झाली की, बहुतांश शेतकरी बैलांची खरेदी करतात. परंतु, अमळनेर तालुक्यात बैलबाजारच बंद असल्याने यंदा शेतकऱ्यांना बैल मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी मशागतीची कामे यंत्राच्या साहाय्यानेच करावी लागत आहे. अमळनेर तालुक्यात कोरोना काळापासून हा बाजारच बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची अवहेलनाच होते. ऐन हंगामात शेतकऱ्यांना बैल घेण्यासाठी दुसऱ्या तालुक्याच्या बाजारावर अवलंबून रहावे लागत आहे. अमळनेर तालुक्याचे मंत्री भूमिपुत्र व कृ.उ.बा सभापती स्वतःला शेतकरी व शेतकरी पुत्र म्हणवून घेतात. परंतु शेतकऱ्यांचा विचार करताना कोणी दिसत नाही. पूर्ण दिवस शेतीची कामे सोडून दुसऱ्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना बैल खरेदी साठी उन्हातानात भटकावे लागत आहे. शेतकऱ्याला बैल आणण्यासाठी वाहनाचा खर्चही लागतो. लांबवरून आणताना बैलाला इजा, दुखापत होते. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची फसवणूक देखील होते.
शेजारील गावातील बाजारांच्या भरवशावर शेतकरी आहे .चोपडा, पारोळा, धरणगाव येथे बैल बाजार भरतो, विविध जातीच्या बैलांची चाळीस हजार ते दीड लाखापर्यंत बैलजोडींची बोली लागते. छोट्या बाजारातही कोट्यावधी रू.ची उलाढाल होते. या तालुक्यांमध्ये अमळनेर तालुक्यातील अनेक शेतकरी बैल घेण्यासाठी जात आहे. अमळनेर तालुका हा वरील सर्व तालुक्यांत मोठा तालुका आहे. शिवाय अमळनेर तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती देखील मोठी आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर सारख्या मोठ्या तालुक्यात बैल बाजार भरणे आवश्यक आहे. या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी खालील प्रमाणे प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तालुक्यात बैल बाजार सुरू करावा..
• शेतकऱ्यांसाठी अमळनेर तालुक्यात बैल बाजार सुरू करावा, बैल बाजार सुरू करताना शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी योग्य माध्यमातून प्रचार व प्रसार करावा. जेणेकरून शेतकऱ्यांना समजेल की पुन्हा बैलबाजार सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या बाजार समितीने नेहमी शेतकऱ्यांचे हित जपावे.- सचिन धनगर – शेतकरी
बैल घेण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागते…
अमळनेर ही सर्वात मोठी बाजार समिती असूनही आम्हाला दुसऱ्या गावात पारोळा, चोपडा इ ठिकाणी जावून बैल घ्यावे लागतात. अमळनेर येथे बैल बाजार भरला पाहिजे की जेणे करून तालुक्यातील शेतकरीला पशुधन घेण्यासाठी दुसरी कडे जावे लागणार नाही.
उमेश पाटील -शेतकरी
दरम्यान भ्रमणध्वनी वरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी खालील प्रतिक्रिया दिल्या.
बैल बाजार दिवाळी नंतर सुरू करणार…
• कोरोना काळात शासनाच्या आदेशानुसार बाजार बंद करण्यात आला होता, तेव्हापासून बाजार बंदच आहे. सद्यस्थितीत शेळ्या, मेंढ्यांची खरेदी-विक्री सुरू आहे. यात काही वेळा बैलांची देखील खरेदी विक्री होते. प्रतिसाद न मिळाल्या मुळे बैल बाजार बंद झाला होता. पण आता दिवाळीनंतर सुरू करू -आता आधीच शेतकऱ्यांनी पशू धन खरेदी केले आहे. अमळनेर बाजार समिती ही सर्वात मोठी बाजार समिती आहे. आणि त्यामुळे भविष्यात बैल बाजार सुरू केला जाईल…
अशोक पाटील- सभापती कृ.उ.बा समिती अमळनेर






