?दंगल राजकारणाची…राष्ट्रवादीचा उद्या मुंबईत राजकीय धमाका..!भाजप नेत्याच्या हाती पुन्हा घड्याळ..!
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस नगर जिल्ह्यात मोठा राजकीय धमाका करणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांनी हातातील घड्याळ सोडले होते. निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाजी पलटवली. त्यामुळे अनेकजण परतू लागले आहेत. आता सरकार आल्यानंतर तर इन्कमिंगचे प्रमाण वाढले आहे.
अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड त्यांचे चिरंजीव वैभव हे पवार कुटुंबासोबत निष्ठावान होते. परंतु त्यांनी पक्षावरील वेळ पाहून भाजपात उडी मारली. निवडणुकीत वातावरण फिरले आणि डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांचा धक्कादायक पराभव केला. या पराभवासाठी सर्व नेते एकत्र आले होते.
मागील पंधरवड्यात नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतही पिचड यांना राष्ट्रवादीने पेचात पकडले होते.
त्यामुळे वैभव यांना माघार घ्यावी लागली होती. तेव्हा अमित भांगरे यांना बिनविरोधची संधी मिळाली.
पिचड यांचे कट्टर समर्थक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशामुळे बिनविरोध करण्यात आले होते. तेव्हाच पिचड यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजली होती. पुन्हा हेच गायकर उद्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. गायकर यांचा राष्ट्रवादी प्रवेश पिचड यांच्यासाठी धक्का आहे.
मुंबई येथे उद्या अजितदादांच्याच उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी अकोल्याचे आमदार डॉ. लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह अकोल्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
आगामी काळात अगस्ती कारखान्याची निवडणूक आहे. ती निवडणूक गायकर यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याची राष्ट्रवादीची रणनीती असल्याचे समजते. हा कारखाना पिचड यांच्या ताब्यात आहे.






