Maharashtra

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली,तहसीलदारावर काय कार्यवाही होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली,तहसीलदारावर काय कार्यवाही होणार

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद : अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी ऐश्वर्या कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात दंडात्मक आदेश पारित करून वसुलीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी कळंबच्या तहसीलदार मंजुषा लटपटे यांना १९ जून २०२० रोजी दिले होते.

परंतु कळंबच्या तहसीलदारांनी ठेकेदाराशी संगणमत करून या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान, जिल्हाधिका-यांनी अशाच प्रकरणात याच दिवशी उस्मानाबादच्या तहसीलदारांनाही आदेश दिले होते. त्यांनी २५ जून रोजी संबधित ठेकेदाराच्या विरोधात दंडात्मक आदेश पारीत करुन वसुलीची कारवाई प्रस्तावित केली आहे.

कळंब तालुक्यात कळंब-लातूर रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. कळंब-लातूर रस्त्याचे काम ऐश्वर्या कंन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. कळंब-लातूर या रस्त्याच्या कामासाठी गौण खनिज उत्खनन परवाना २१ हजार ५०० ब्रासचा असताना प्रत्यक्षात ३९ हजार ५५९ ब्रासचे उत्खनन झाले. त्यामुळे येथील कामात १८ हजार ६९ ब्रासचे अवैध उत्खनन झाले.

याबाबत जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ऐश्वर्या कंपनीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यासाठी सुनावणी ठेवली होती. सुनावणीअंती १८ हजार ६९ ब्रासचे अवैध उत्खनन केल्याचे उघड झाले होते.

त्यानुसार जिल्हाधिका-यांंनी कळंबच्या तहसीलदार यांना दंडात्मक आदेश पारीत करुन पाचपट दंड वसूल करण्याचे आदेश दिले होते. परंतु तहसीलदार मंजुषा लटपटे यांनी जिल्हाधिका-यांचा आदेश न जुमानता तहसील कार्यालय स्तरावर ठेकेदाराची सुनावणी घेवून मुजोरपणा दाखवला. त्यातच वसुलीची कारवाईही रेंगाळत ठेवली आहे.

विशेष म्हणजे ऐश्वर्या कंपनीने रांजणी येथे बेकायदेशीर व नियमबाह्यपणे दगड खदान, स्टोन क्रशर, डांबर प्रकल्प उभारला आहे. याकडेही तहसीलदारांनी दुर्लक्ष केले.

*काय कारवाई होणार याकडे लक्ष*

जिल्हाधिका-यांनी कळंब व उस्मानाबादच्या तहसीलदारांना एकाच दिवशी आदेश दिल्यानंतर उस्मानाबाद तहसीलदारांनी वसूलीची कारवाई तात्काळ केली. मात्र कळंबच्या तहसीलदार लटपटे यांनी ऐश्वर्या कंपनीला वाचविण्यासाठी कारवाई करण्यास विलंब केला आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ कळंबच्या तहसिलदारावर काय कारवाई करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button