Bigg Boss:बिग बॉस 16 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..!जाणून घेऊ ह्या घराची काही रहस्ये..!
टीव्हीवरून लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा १६ वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा शो होस्ट करणार आहे. सेलिब्रिटींचे वाद, प्रेम, टास्क या सर्व गोष्टींमुळे हा शो चाहत्यांना आवडतो. या शोच्या १६ सीझनबद्दल आतापासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘बिग बॉस १६’ मध्ये येणाऱ्या स्पर्धकांव्यतिरिक्त बिग बॉसचे घर कसे आहे, ते कुठे आहे, ते घर कोण बनवतं आणि त्याची किंमत किती आहे, याबद्दलही लोकांना उत्सुकता असते. आज आपण बिग बॉसच्या घराशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
बिग बॉसचे घर कुठे आहे?
बिग बॉसच्या पहिल्या ते चौथ्या सीझनसाठी आणि नंतर सहाव्या ते बाराव्या सीझनसाठी मुंबईजवळील लोणावळ्यात एक घर बांधण्यात आलं होतं. पाचव्या सिझनसाठी बिग बॉसचे घर मुंबईजवळ कर्जतमध्ये बांधण्यात आले होते. यानंतर १३व्या आणि १४व्या सीझनचे बिग बॉसचे घर मुंबईतील गोरेगावमध्ये बांधण्यात आले
बिग बॉसचे घर पूर्णपणे फर्निश्ड, सजवलेले आणि सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. हे घर सुमारे १८,५०० चौरस फूट जागेत पसरलेले आहे. या घरात स्वयंपाकघर, लिव्हींग रुम, १-२ बेडरूम, ४ टॉयलेट आणि बाथरुम असतात. घरामध्ये स्टोअर रूम, गार्डन, स्वीमिंग पूल, अॅक्टिव्हिटी एरिया आणि एक जिम आहे. या घरात एक कन्फेशन रूम देखील बनवली असून तिथे स्पर्धक बिग बॉसशी बोलतात. घरातील सुखसोई पाहता या घराची किंमत कोटय़वधींमध्ये नक्कीच असेल. पण आतापर्यंत कधीच निर्मात्यांनी या घराची किंमत जाहीर केलेली नाही.
बिग बॉसचे घर किती वेळेत तयार होते?
वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसचे घर तयार करण्यासाठी सुमारे ५०० ते ६०० मजूर लागतात आणि हे घर तयार करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागतो.
बिग बॉसचे घर कोण डिझाईन करते?
बॉलीवूडमध्ये ‘सरबजीत’, ‘मेरी कॉम’, ‘भूमी’ आणि ‘पीएम नरेंद्र मोदी’ सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी विनिता बिग बॉसचे घर डिझाइन करतात. विनिता इंटिरियर डिझायनर आहे तर ओमंग कुमार अनेक बॉलिवूड चित्रपटांचे आर्ट डिझायनर आहेत.
बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी किती खर्च येतो?
१२ ते १५ स्पर्धकांसाठी रोजचे जेवण, शाम्पू-साबण ते विजेचा खर्च एकत्र केल्यास बिग बॉसच्या घरात एका दिवसासाठी १५ ते २० हजार रुपये खर्च येतो.
बिग बॉससाठी दररोज किती कर्मचारी काम करतात?
बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये ८ तासांच्या शिफ्टमध्ये २५० ते ३०० क्रू मेंबर काम करतात. त्यानुसार संपूर्ण २४ तासांत क्रूचे १००० ते १२०० लोक काम करतात. त्यांची शिफ्ट संपण्यापूर्वी प्रत्येक क्रू मेंबर पुढच्या शिफ्टमध्ये असलेल्या मेंबरला घरातील सर्व गोष्टी समजावून सांगतो. याशिवाय या घराच्या सुरक्षेसाठी २४ तास ५० ते ६० सिक्युरिटी गार्ड्स तैनात असतात.
बिग बॉसच्या घराचा एकूण खर्च किती आहे?
आतापर्यंत बिग बॉसची निर्मिती करणाऱ्या कंपनीने याबाबत कधीही खुलासा केला नाही. पण एका सीझनमध्ये बिग बॉसच्या घरावर १५ ते २० कोटींचा खर्च केला जातो, असं म्हटलं जातं.






