Jalgaon Live: निवडणूक ड्युटी वर तीन वेगवेगळ्या घटनेत चार महिला कर्मचाऱ्यांचा अपघात, दोन पुरुष कर्मचाऱ्यांचा मृत्यू…!
जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी मंगळवारी किनगाव (ता.यावल) येथे साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे जात असलेल्या चार महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात चार महिला कर्मचारी जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगाव येथून रावेर विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य घेऊन जाताना केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी सुलताने, प्राथमिक शिक्षिका ज्योती भादले, कविता बाविस्कर आणि लतिफा खान यांच्या वाहनाला यावल तालुक्यात किनगाव बुद्रुक गावाजवळ अपघात झाला.
या अपघातात चारही महिला कर्मचारी जखमी झाल्याने त्यांना चोपडा येथे तातडीने हलविण्यात आले. अपघातामुळे मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली असून, पर्यायी व्यवस्थेद्वारे मतदान साहित्य निर्धारित केंद्रांवर पोहोचविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
दुसऱ्या घटनेत 20 तारखेला सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्याचदरम्यान, जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९) उपशिक्षक अनवर्दे बुधगांव हे मतदानाच्या (बी.एल.ओ) कर्तव्यावरून त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी परत जात असताना मोटारसायकलचा अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. परिवारासह ते गावात राहत होते. दरम्यान त्यांची निवडणुकीनिमित्त शासनाने ड्युटी लावली होती. मतदान कर्तव्यावर असताना व काम आटोपून घरी बभळाज गावी रात्री परत जात असताना संध्याकाळी ७ वाजेनंतर हातेड गलंगी दरम्यान व चोपडा शिरपूर रस्त्यावर गलंगी चौकात त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. नागरिकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
तिसऱ्या घटनेत जळगाव शहरात एका केंद्रावर कर्तव्य बजावल्यानंतर ईव्हीएम मशीन जमा करून घराकडे परतणाऱ्या शिक्षकाचा एरंडोल नजिक रस्त्यातच हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. ते भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी होते.
विजय भास्कर पाटील (४८) असे या शिक्षकाचे नाव आहे. ते पथराड तांडा ता. भडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते. गुढे ता. भडगाव येथील रहिवासी असलेले विजय पाटील यांना जळगाव येथील अंध माध्यमिक विद्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.
दि. २० रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यावर ईव्हीएम आणि इतर साहित्य त्यांनी जमा केले. यानंतर ते मित्रांसह खासगी वाहनाने गुढ्याकडे परतत होते. त्यावेळी एरंडोलनजीक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे सोबतच्या मित्रांनी त्यांना जळगावला आणले. उपचार सुरू असतानाच त्यांचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जातील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.






