जळगांव Live…कारागृहातील कैद्याचा उपचारा अभावी मृत्यु ..कुटूंबीयांचा आरोप
इनकॅमेरा शवविच्छेदन .. रुग्णालयात तणाव ..पोलिसांच्या मध्यस्तीने मृतदेह ताब्यात
जळगाव खुनाच्या गुन्ह्यात तीन वर्षापासून कारागृहात असलेल्या पवन नारायण महाजन (वय २८), रा.एरंडोल याचा मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्हा कारागृहाने वेळीच पवनला उपचारासाठी दाखल केली नाहीत म्हणून परिणामी त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पवनचा मामा आणि भाऊ यांनी केला आहे. कारागृह अधिक्षकांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत योग्य आणि वेळेवरच त्याच्यावर उपचार झाल्याचे स्पष्ट केले आहे. कारागृहातील बंदीवानाचा मृत्यु झाल्याचे कळातच इतर बंद्यांनी सकाळ पासून अन्नत्याग करुन उपोषण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
कुटूंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन याची २० जुलै रोजी कारागृहात प्रकृती बिघडली होती. त्यादिवशी त्याला डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले. तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. त्यानंतर गुरुवारी रात्री त्याची प्रकृती खालावल्याने २३ रोजी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दिवसभर वेगवेगळ्या चाचणी कराव्या लागल्यामुळे त्याच्यावर कोणतेच उपचार झाले नाहीत. शुक्रवारी रात्री ९ वाजता चाचण्यांचे अहवाल आल्यावर त्याला डायबेटीस जास्त प्रमाणात असल्याचे निदान समोर आले. तेव्हा त्याला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. बुधवारी पहाटे २ वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. २० जुलै रोजी कारागृहातुन डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले होते, तेव्हाच दाखल करुन घेतले असते तर वेळेवर उपचार होऊन त्याचा जीव वाचला असता, मात्र कारागृह प्रशासनाने त्याकडे हलगर्जीपणा केल्याचा आरोप पवनचे मामा श्याम महाजन यांनी केला आहे.
पवन याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. कारागृह अधीक्षक आणि यंत्रणेवर हलगर्जीपणाचा आरोप करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. वातावरण तापल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी पवनच्या नातेवाईकांची समजूत घातली. न्यायालयीन बंद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याची न्यायालयीन चौकशी होते. मृत्यूचे कारणही शवविच्छेदन अहवाल स्पष्ट होईल, असे सांगून कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. यावेळी पवनवर इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. सर्व कायदेशीर बाजू सांगून उप पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी नातेवाईकांची समजूत काढून मृतदेह ताब्यात दिला.






