महापौर-उपमहापौर यांनी काढले झाडांचे खिळे वसुंधरा प्रतिष्ठान : खिळेमुक्त झाड अभियानाला प्रतिसाद
प्रशांत नेटके लातूर
लातूर : लातुर येथील वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे शहरात खिळेमुक्त आणि वेदनामुक्त झाड हे अनोखे अभियान राबविण्यात येत आहे. व्यावसायिकांनी आपल्या जाहिराती लावण्यासाठी झाडांना मोठ्या प्रमाणावर खिळे मारले आहेत. रविवारी हे खिळे काढण्यात आले. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी या उपक्रमात सहभागी होत स्वतः झाडांचे खिळे काढले.
आपल्या व्यवसायाच्या, क्लासेसच्या जाहिराती लावण्यासाठी अनेक व्यापारी शहरातील झाडांना मोठं मोठे खिळे मारत आहेत. वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे 2018 पासून शहरात खिळेमुक्त झाड अभियान राबवून वसुंधरा प्रतिष्ठानने अनेक झाडांना खिळेमुक्त केले आहे. मात्र, अनेकवेळा आवाहन करून देखील व्यापारी जाहिराती लावण्यासाठी झाडांना वारंवार खिळे मारत आहेत. झाडेही सजीव असून झाडांनाही वेदना होतात. त्यामुळे झाडांना खिळे मारू नये असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. शिवाय, शहरातील सर्व झाडे खिळेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. लातूरचे महापौर आणि उपमहापौर यांनी स्वतः या उपक्रमात सहभागी होऊन झाडांना खिळे मारू नका, असे आवाहन व्यावसायिक यांना केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून औसा रोडवरील जवळपास सगळीच झाड खिळेमुक्त आणि वेदनामुक्त करण्यात आली. या उपक्रमात महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, सचिव रामेश्वर बावळे, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, संघटक प्रशांत स्वामी, प्रवक्ते हुसेन शेख, सदस्य शिवाजी निरमनाळे, कृष्णा काळे, राहुल माशाळकर, गणेश स्वामी, गणेश पाटील आदींनी सहभाग नोंदवला.
झाडांना देऊ नका त्रास
झाडच देतात जगण्यासाठी श्वास
झाडांना देऊ नका कारण झाडच देतात जगण्यासाठी मोकळा श्वास असा संदेश देणारे फलक वसुंधरा प्रतिष्ठानने दोरीच्या साहाय्याने झाडांवर लावले आहेत. झाडही सजीव आहेत त्यांनाही खिळे मारल्याने वेदना होतात. झाडांच्या या वेदना सर्वांनी ओळखून झाडांना खिळे मारू नये असे आवाहन या फलकाच्या माध्यमातून करण्यात आले. या उपक्रमाचे महापौर आणि उपमहापौर यांनी कौतुक केले आहे.







