? आरोग्य चा मुलमंत्र
मुतखडा (Kidney stone)
{करणे, लक्षणें व उपचार}
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच चुकीच्या आहारामुळे किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. परिणामी आपल्याला मुतखड्या सारख्या भयंकर आजाराला सामोरे जावे लागते.
मुतखडा होण्याची कारणे
मुतखडा होण्यास दैनंदिन जीवनातील अनेक बाबी कारणीभूत असतात
१. अनुवंशिकता
जर तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती (आई किंवा वडील) यांना मुतखडा असेल तर तुम्हाला मुतखडा होण्याची संभाव्यता जास्त असते.
२. शरीराचे निर्जलीकरण (डीहायड्रेशन)
पुरेसे पाणी न पिणे, शरीरातील पाण्याचा अतिसार होणे याच्यामुळे मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात. जास्त उष्ण भागात राहणारे लोक किंवा जास्त वेळ उन्हात काम करणाऱ्या लोकांच्या शरीरातून जास्त प्रमाणात घाम बाहेर पडतो. त्यामुळे संबंधित व्यक्तींना मुतखडा होण्याचे प्रमाण जास्त असते.
३. दैनंदिन आहार
जास्त प्रमाणात प्रथिने (प्रोटिन्स), सोडियम (मीठ), आणि साखर यांचा जास्त प्रमाणात समावेश असलेला आहार घेतल्याने मुतखडा होऊ शकतो. जेवणामध्ये मिठाचा जास्त वापर करणे हे मुतखडा होण्याचे प्रमुख कारण आहे. जास्त मिठाचे सेवन केल्याने किडनीमध्ये सोडियम कॅल्शियम शुद्ध करण्याचे प्रमाण वाढते परिणामी मुतखडा होऊ शकतो.
४. स्थूलता
जास्त स्थूलता असलेले व्यक्ती, ज्यांचा कंबर नितंब घेर (बॉडी मास इंडेक्स) जास्त आहे किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक असते.
५. पचनाचे आजार व शस्त्रक्रिया
बायपास शस्त्रक्रिया, आतड्यांचे आजार, जुलाब किंवा अतिसार यामुळे आपल्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे कॅल्शिअम व पाणी यांच्या शोषणावर परिणाम होतो, व त्यामुळे शरीरात मुतखडा तयार करणाऱ्या पदार्थांचे प्रमाण वाढते.
६. संधी रोग
संधी रोगामुळे आपल्या शरीरात सतत रासायनिक व भौतिक घडामोडी घडत असतात. ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये मूत्राशयाच्या आजारांना पूरक कॅल्शियम सोडियम सारख्या स्पटिक पदार्थांचे प्रमाण वाढते. हे एक मुतखडा होण्याचे महत्वाचे कारण आहे. तुम्ही वाचत आहात मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय.
७. लघवी वेळेवर न करणे
जास्तवेळ शरीरात लघवी रोखून धरल्याने आपल्या मूत्रमार्गामध्ये स्पटिकजन्य पदार्थांचे संचयन होते व यामुळे मुतखडा होऊ शकतो.
मुतखडा झाल्याची लक्षणे
१. अचानकपणे ओटीपोटात किंवा पोटाच्या एका बाजूला, पाठीमध्ये तीव्र वेदना होतात.
२. लघवी करताना त्रास होतो किंवा अस्वस्थ वाटते.
३. वारंवार लघवीला आल्यासारखे वाटते.
४. मळमळ किंवा उलटी चा त्रास होतो. मुतखडा झाल्यावर शरीरातील विषारी पदार्थ व्यवस्थितपणे शरीरातून बाहेर टाकले जात नाहीत परिणामी मळमळ किंवा उलटीचा त्रास होतो.
५. सतत ताप येणे व थंडी वाजून येणे.
६. लघवीचा रंग बदलतो. गुलाबी, लालसर किंवा केशरी होतो.
७. लघवी फेसाळ होते व अतिशय उग्र वास येतो.
८. किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींची भूक मंदावते व अस्वस्थता वाढते.
मुतखड्याचे प्रकार
मुख्यता मुतखड्याचे खालील प्रमाणे प्रकार पडतात.
१. कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन्स
कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन हा मुतखड्याचा प्रमुख प्रकार आहे. शरीरामध्ये साइट्रेट व कॅल्शियम कमी प्रमाणात आढळते तेव्हा या प्रकारच्या मुतखड्याची शक्यता जास्त असते. ब्लॅक टी, बीट, बटाटे व पालक या पदार्थांमध्ये ऑक्साईडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हा मुतखडा होऊ शकतो.
२. कॅल्शियम फॉस्फेट स्टोन
कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स हे मूत्र प्रणालीच्या कार्यामध्ये अडथळे आल्यास उद्भवतात. यामध्ये डॉक्टर रक्त व लघवीच्या अनेक चाचण्या घेतात. कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स हे कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन्स सोबत होऊ शकतात.
३. यूरिक ॲसिड स्टोन्स
या प्रकारचा मुतखडा सामान्यतः पुरुषांमध्ये आढळतो. ज्या व्यक्ती पुरेसे पाणी पीत नाहीत व ज्यांच्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त मांसाहार जास्त असतो अशा व्यक्तींना युरिक ऍसिड स्टोन होऊ शकतो.
४. सिस्टीन स्टोन्स
या प्रकारचा मुतखडा अनुवंशिकतेमुळे उद्भवतो. सिस्टीन्युरिया नावाच्या अनुवंशिक डिसऑर्डर मुळे मुतखड्याचा हा प्रकार होतो. यामुळे मुत्रामध्ये सिस्टीन नावाचे अमिनो ऍसिड जास्त प्रमाणात जमा होते व मूत्रपिंडामध्ये किंवा मूत्राशयामध्ये तसेच मूत्रमार्गामध्ये छोटे छोटे दगड तयार होतात.
५. स्टृवाइट स्टोन्स
या प्रकारचा मुतखडा सामान्यतः स्त्रियांमध्ये आढळून येतो. मूत्रमार्गातील संसर्गामुळे हा मुतखडा होतो व याचे छोटे दगड जलद गतीने तयार होतात.
मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय
मुतखडा झाल्यास खालील उपायांचा अवलंब करावा
१. नैसर्गिक विधी वेळेवर करणे
नैसर्गिक विधी वेळेवर केल्याने आपल्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ जास्त काळ आपल्या शरीरात साचून राहत नाही व परिणामी मुतखड्याचा धोका टळू शकतो.
२. जास्त पाणी पिणे
जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीराची पाणी पातळी नियंत्रित राहते व शरीरातून स्फटिजन्य पदार्थांचे निर्मूलन करण्यास मदत होते.
३. डाळिंबाचा रसाचे सेवन करणे
मुतखडा झालेल्या व्यक्तीसाठी डाळिंबा च्या रसाचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते. डाळिंबाचा रसामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे मुतखडा विरघळण्यास मदत होते.
४. लिंबूवर्गीय फळांच्या रसाचे सेवन करणे
लिंबूवर्गीय फळांचे सेवन करणे हे मूत्रपिंडाच्या आजारांवर अतिशय फायदेशीर आहे. लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक ऍसिड मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय मध्ये लिंबाचा समावेश होतो. सायट्रिक ऍसिड मूत्राशयातील इन्फेक्शन वर अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे मुतखड्याचा आजार असलेल्या व्यक्तींनी लिंबूवर्गीय फळांचे सेवन करावे.
५. तुळशीच्या पानांचा रस
तुळशीच्या पानांमध्ये मोठ्याप्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात, जे मुतखड्यावर गुणकारी आहेत. म्हणून मुतखडा झालेल्या व्यक्तीने तुळशीच्या पानांचा रस सेवन करावा.
६. पानफुटीच्या पानांचा रस सेवन करणे
आपल्याला घराच्या परसबागेत कुठेही पानफुटी सहजपणे उपलब्ध होते. पानफुटीची पाने ही आयुर्वेदिक आहेत. पानफुटीच्या पानांचा रस सेवन केल्याने मुतखड्याचा त्रास कमी होतो.
७. मिठाचे सेवन कमी करावे
आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये मीठ खाण्याचे प्रमाण कमी असावे. मिठामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम असते, सोडियम मूतखडा होण्यास कारणीभूत आहे, त्यामुळे मिठाचे सेवन प्रमाणातच करावे.
८. मांसाहार कमी करावा
जास्त प्रमाणात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींमध्ये मुतखड्याचे प्रमाण अधिक असते. मांसाहारामुळे आपल्या शरीरात कॅल्शियमची उपलब्धता वाढते. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढल्याने मुतखडा होऊ शकतो.
डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथीक तज्ञ)






