नाशिक मनपा आयुक्त राधाकृष्ण गमेंची बदली
नाशिक शांताराम दुनबळे नाशिक-:
केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकला देशात अकराव्या , तर स्मार्ट शहरांत नाशिकला राज्यात पहिल्या स्थानी आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बदली झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे . कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच गमे यांची बदली होत असून , त्यांच्या जागी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते . गमे यांच्या बदलीची लवकरच ऑर्डर निघणार आहे , गमे हे ५ डिसेंबर २०१८ पासून महापालिका आयुक्तपदाची धुरा सांभाळत आहेत . त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या . अलीकडेच केंद्र सरकारने स्वच्छता सर्वेक्षणात अग्रक्रम मिळविणाऱ्या शहरांची यादी जाहीर केली . त्यामध्ये नाशिकने झेप घेतली . यातील स्मार्ट शहरांच्या यादीमध्ये देखील नाशिक शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे . शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना संसर्गाला अटकाव करण्यासाठी गमे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेची यंत्रणा प्रयत्न करीत आहे मात्र , या मोहिमेत समन्वयाचा अभाव असल्याची टीका यांच्यावर झाली आहे . एकीकडे अशा विविध स्तरावर नाशिक महापालिका चर्चेत असताना त्यांच्या बदलीची चर्चा शहरात सुरू झाली आहे .
गमे यांच्या बदलीच्या चर्चेत तथ्य असल्याचे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे . करोनासारख्या संकट काळात आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली होणे ही गमे यांच्या विरोधातील राजकीय खेळी असल्याची चर्चाही होत आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गमे यांच्या बदलीच्या ऑर्डरवर स्वाक्षरी केली असून , मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मात्र अद्याप स्वाक्षरी झाली नसल्याचे समजते .
विभागीय आयुक्तपदावर दावा गमे यांनी नाशिकमध्ये महापालिकापदाची सूत्रे हाती घेऊन उणीपुरी पावणेदोन वर्षे पूर्ण होत आहेत . डिसेंबर २०२० मध्ये त्यांना महापालिका आयुक्तपदाचा कारभार हाती घेऊन दोन वर्ष पूर्ण होणार आहेत . तेव्हाच त्यांची पदोन्नती देखील निश्चित मानली जाते आहे . नाशिकचे विद्यमान विभागीय आयुक्त राजाराम माने लवकरच निवृत्त होत असून , त्यांच्या जागी गमे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे . परंतु , तूर्तास तरी गमे यांना कोठे नियुक्ती मिळणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही . त्यांच्या जागी कैलास जाधव येणार असून , त्यांनी यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नाशिकमध्ये काम केलेले आहे .






