स्वेरी’ चा ‘नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया ‘सोबत सामंजस्य करार
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या सिव्हील इंजिनीअरिंग विभागाचा नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एन.एच.ए.आय.) सोबत नुकताच पाच वर्षासाठीचा सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
हा करार स्वेरीच्या विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हायवे आणि वाहतूक क्षेत्रासंबंधातील कौशल्य वाढीस उपयुक्त ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिकत असताना साईटवरील चालू कामांचा अनुभव घेण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सामंजस्य करारावर ‘नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ तर्फे पी. आय. यु.सोलापूरचे प्रोजेक्ट डायरेक्टर संजय कदम व महाविद्यालयातर्फे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सोलापूरच्या प्रोजेक्ट कार्यालयात स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी संस्थेचे विश्वस्त अशोक भोसले व प्रा. सुरज रोंगे तसेच सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार हे उपस्थित होते. यामध्ये पदवीच्या विद्यार्थ्यांना रु. आठ हजार तर पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना रु. पंधरा हजार स्टायफंड स्वरुपात मिळणार आहे. याशिवाय ‘नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ बरोबर झालेल्या सामंजस्य करारामुळे रस्ते व वाहतूक क्षेत्रातील नवनवीन उपक्रमांचा परिचय होण्यासही मदत मिळणार आहे तसेच औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाच्या बाबत औद्योगिक संस्था व शैक्षणिक संस्था यामधील अंतर कमी होण्यासाठी मदत होणार आहे. या कराराद्वारे सुरवातीच्या काळात सोलापूर-येडशी विभाग, सोलापूर एम.एच. अथवा के.एन.टी. सीमा विभाग व करमाळा-टेंभूर्णी विभागांमध्ये महामार्ग बांधकाम अंतर्गत देखभाल व प्रकल्प नियोजन या कामात स्वेरीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांची ‘नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया’च्या पदाधिकाऱ्यांना मदत होणार आहे. या करारामुळे संशोधन व विकासाला देखील आणखी गती येणार आहे. स्वेरी संस्थेचे विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक यांनी या प्रकल्पांना दिलेल्या भेटी दरम्यान तांत्रिक अभिप्रायाची अंमलबजावणी कामाच्या ठिकाणी केली जाणार आहे. त्यामुळे वरील प्रकल्पांच्या अंतर्गत गुणवत्ता व दुरुस्ती संबंधी सुधारणा होण्यासाठी स्वेरीची मदत होणार आहे. नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया सोबत स्वेरीमधील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक यांची तांत्रिक बाबीं संदर्भात देवाण घेवाण होणार आहे व या करारानुसार संस्थेमध्ये त्या संदर्भातील प्रयोगशाळा सुविधा निर्मिती व सुधारणा होण्यासाठी मदत होणार आहे. या कराराद्वारे स्वेरी त्यांच्या प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांद्वारे प्रकल्पांची तपासणी करून महामार्गाची कार्यक्षमता सुधारणे, सद्य स्थितीतील महामार्गांच्या असलेल्या कमतरता दूर करून सुरक्षा तरतुदीत सुधारणा करणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महामार्गांची देखभाल करणे, वाहतुकीच्या प्रवाहाचा सरासरी वेग वाढवण्यासाठी स्थानिक उपाय योजना करणे, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित प्रभावी उपाय योजनांच्या माध्यमातून वाहतूक सोयीमध्ये सुधारणा करणे, आताची वाहतूक कोंडी आणि वापरकर्त्यांच्या अपेक्षांवर आधारित रस्ता वापरकर्त्यांसाठी नवीन मार्गाच्या सुविधा सूचित करणे, स्थानिक अनुभवावर आधारित जुन्या समस्यांचे संभाव्य निराकरण करणे, नवीन प्रकल्पांची संकल्पना, डिझाईन व प्रकल्प तयार करण्यासाठी संभाव्यतेच्या अनुभवावर आधारित कल्पना सुचवणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. या करारापूर्वी स्वेरीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर ३० कंपन्यांबरोबर सामंजस्य करार स्थापित झालेले आहेत. अशा करारामुळे स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच संशोधनाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळविला जाईल हे पाहून त्या दृष्टीने संस्थेने पाऊले उचलली आहेत. याच कारणामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व परराज्यातील विद्यार्थी देखील स्वेरीकडे शिक्षणासाठी वळत आहेत. भारत सरकारच्या भाभा अनुसंशोधन केंद्रासह इतर अनेक संस्थाबरोबर झालेल्या करारामुळे आजमितीस संशोधनासाठी रु. ७ कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला आहे. स्वेरीचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट आणि विद्यापीठात सर्वोच्च निकाल मिळविण्याबरोबरच संशोधनाकडे वळत आहेत ही सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालादेखील गौरवाची बाब आहे. या नवीन करारामुळे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळणार आहे. या करारामुळे संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इनचार्ज प्रा. एम. एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांचे अभिनंदन केले.






