खेड ता पुणे प्रतिनिधी
प्रत्येक वर्षी सर्वच गणेशोत्सव मंडळ आणि घरातही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेचे संस्थापक मा.श्री.देवा तांबे यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकारी तसेच गणेश प्रेमी बांधवांना केले आहे.
पर्यावरण मित्र संघटना,भारत ही संस्था संपूर्ण भारत देशांतील विविध राज्यात पदाधिकारी व पर्यावरण मित्र टिम मार्फत पर्यावरण संरक्षणाचे निस्वार्थ कार्य करीत आहे. संबंध महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.परंतु गणेश मूर्ती साठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस मुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरण प्रदूषण होत आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात, विहिरीत विसर्जित करून ते पाणीसाठे दूषित करण्याऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती पुजून नंतर त्या कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणं ही काळाची गरज आहे असे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे यांनी सांगितले.
या अनुषंगाने संस्थेच्या राज्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यातील पदाधिकारी मार्फत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती चे विनामूल्य वाटप करण्यात आल्याचे सांगितले आहे.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे स्वरूप, त्याचा आयाम आता पूर्णपणे बदलतो आहे.. काही अपवाद वगळता या सणाच्या उपयुक्ततेकडे दुर्लक्ष होत चालले आहे. गणेशोत्सवात सगळ्यात मोठा झालेला बदल म्हणजे गणपतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा झालेला व्यापक शिरकाव तथा त्यातून निर्माण होत असलेल्या भयावह प्रदूषणाच्या समस्या. सोबतच पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर, सजावटीकरिता प्लास्टिकचा वापर, थर्माकोलसारख्या विघटन न होणाऱ्या साहित्याचा वापर, जास्त घातक रासायनिक रंगाचा वापर, गुलालाची अतिरेकी उधळण, या सर्वामुळे मोठय़ा प्रमाणावर जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.
या वर्षी राज्यात बऱ्याच जिल्ह्यात जनता दुष्काळाने होरपळून निघते आहे. पावसाळ्यात सुद्धा गुरांना चारा तथा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर कित्येक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. पाण्याअभावी लाखो हेक्टर जमीन पेरणीविना पडीक पडलेली आहे. या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवातून मोठय़ा प्रमाणात होणारे जलप्रदूषण रोखणे आवश्यक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठमोठय़ा गणपती मूर्ती पाण्यात विसर्जित होण्याएवढे पाणीदेखील नदी पात्रात नसते. गणेशभक्तांद्वारा त्या मूर्ती तशाच सोडून देण्यात येतात. या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. नदीपात्रात साचून राहतात. पर्यायाने नदीपात्रात प्लास्टरचा थर निर्माण होतो. परिणामी पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. पर्यायाने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होते. विहिरी, बोअर, तलाव आदींमध्ये पाणी न झिरपल्यामुळे ते कोरडे पडण्याचा धोका संभवतो. आपण नदीतील गाळाची माती सुपीक म्हणतो पण प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नदीतील गाळाच्या मातीचा पोत खराब होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मूर्ती रासायनिक रंगांनी रंगवल्या जातात. यामुळे मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण होते व त्याचा मानवी जीवनावर मोठा दुष्परिणाम जाणवतो. काळ्या रंगात ऑक्साइड रसायन असते. यामुळे मूत्रसंस्थेचे कार्य बंद पडते. हिरव्या रंगातील कॉपर सल्फेटमुळे डोळ्यांचे विकार होतात. चांदीसारख्या रंगात असणाऱ्या अॅल्युमिनियम ब्रोमाईड रसायनामुळे कर्करोग होतो. निळ्या रंगात पार्शियन नीळ असते. यामुळे त्वचेचे आजार संभवतात. तर लाल रंगातील मक्र्युरी सल्फाईड हे विषारी रसायन मोठय़ा प्रमाणावर असते. त्यामुळे त्वचेचा रोग होतो. गणेशोत्सवानंतर नदी, तलाव, धरणे, बंधारे आदींची पाहणी केली असता हजारोंच्या वर पाण्यात न विरघळलेल्या व भंगलेल्या गणेशमूर्तीमुळे आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व बघून कुण्याही खऱ्या गणेशभक्ताचे मन विषण्ण झाल्यावाचून राहत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीचा वापर करायला हवा असेही श्री.देवा तांबे यांनी सांगितले.
तसेच विघ्नहर्त्यांच्या प्लास्टरच्या मूर्तीमुळे लाखों जलचरांवर, समुद्री जीवांवर मृत्युमुखी पडण्याचे विघ्न ओढवते आहे. नद्या या आपल्या जीवनदात्या म्हणून ओळखल्या जातात. पिण्याच्या पाण्याच्या सगळ्यात मोठय़ा स्रोत या नद्या व त्यावरील धरणे होत. मात्र याच नद्यांमध्ये प्लास्टरच्या मूर्तीसोबतच हजारो टन निर्माल्य विसर्जित करत मोठय़ा प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. दुष्काळ, पाण्याची टंचाई असताना गणेश विसर्जनाद्वारे मोठय़ा प्रमाणावर जलप्रदूषण करणे ही ईश्वरभक्ती ठरेल का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन हे वाहत्या पाण्याऐवजी कृत्रिम गणेशकुंडात करण्याची आवश्यकता आहे असे आवाहन पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थे द्वारे गणेश भक्तांना करण्यात आले आहे.


