Bollywood

Bollywood Stories: ऑनस्क्रीन मंथरा ललिता पवारच ऑफस्क्रिन आयुष्य…! एका थप्पडने आयुष्य केलं बरबाद..!

Bollywood Stories: ऑनस्क्रीन मंथरा ललिता पवारच ऑफस्क्रिन आयुष्य…! एका थप्पडने आयुष्य केलं बरबाद..!

अशी काही पात्रं आणि कलाकार असतात जे आयुष्यभर मनावर छाप सोडून जातात. अशीच एक हाडाची कलाकार होती ती म्हणजे अभिनेत्री ललिता पवार. आईची भूमिका साकारून प्रेक्षकांना रडवणाऱ्या तर कधी मंथरासारख्या कपटी दासीची भूमिका साकारणाऱ्या ललिता यांचं नाव जरी समोर आलं तरी तळपायातली आग मस्तकात जायची. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळेच लोक त्यांचा तिरस्कार करायचे. ही खरी त्यांच्या कामाची पावतीच होती. ललिता पवार यांची नुकतीच म्हणजे १८ एप्रिल रोजी जयंती होती. या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याची ओळख करून देणार आहे. ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी नाशिकमधील एका सनातनी कुटुंबात झाला. त्यांचे जन्माचे नाव अंबा लक्ष्मणराव शगुन होते. ललिता पवार यांचा जन्म मंदिराबाहेर झाला हे फार कमी लोकांना माहीत आहे.

मंदिरा बाहेर झाला जन्म
ललिता पवार यांची आई अनुसया या मंदिरात गेल्या होत्या. मंदिराच्या दारापाशी पोहोचताच त्यांना तीव्र प्रसूती वेदना होऊ लागल्या. रुग्णालयात नेण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. आणि मग त्यांनी मंदिराबाहेर मुलीला जन्म दिला, ज्या पुढे ललिता पवार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. ललिता लहानपणापासूनच खूप सुंदर होत्या. त्यांचे डोळे खूप सुंदर होते. ललिता या श्रीमंत कुटुंबातील होत्या. ललिता यांचे वडील रेशीम व्यवसाय करायचे आणि चांगले कमाई करायचे. मात्र सधन कुटुंबातील असूनही ललिता पवार यांना शिक्षण घेता आले नाही. खरे तर ज्या काळात ललिता पवार यांचा जन्म झाला त्या काळात लोक मुलींना फार कमी शिकवायचे. याच कारणामुळे त्यांना अभ्यासही करता आला नाही.

ललिता पवार यांनी वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी अभिनयाच्या विश्वात पाऊल ठेवले. १९२८ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा भारतातील पहिला मूकपट होता. ललिता पवार या त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होत्या. त्यांचे डोळे फार सुंदर होते. पण नेमके त्यांना डोळ्यांनाच इजा झाली. त्यांना नेहमीच हिरोईन व्हायचं होतं, त्यात त्यांना यशही मिळत होतं. पण ललिता यांच्या आयुष्यात अचानक एक घटना घडली, ज्याने सर्व काही बदलून गेले आणि त्यांचे नायिका होण्याचे स्वप्न कायमचे भंगले.

या अपघाताने सगळीच स्वप्न भंगली
साधारण १९४२ मधली ही गोष्ट आहे. जंग-ए-आझादी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. या चित्रपटातील एका सीनमध्ये सहकलाकार भगवान दादांना ललिता पवार यांना एक कानशिलात लगवायची होती. पण चित्रीकरणावेळी ही कानशिलात एवढी जोरदार बसली की, त्यामुळे ललिता यांच्या कानाचा पडदा फाटला आणि डोळ्यालाही इजा झाली. त्याचवेळी चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट होऊन ललिता यांच्या शरीराच्या एका भागाला अर्धांगवायू झाला.

रामायणाने आयुष्य बदलले
एवढ्या मोठ्या अपघातानंतर कोणीही खचून गेलं असतं पण ललिता यांनी कधीच धीर सोडला नाही. अपघातातून सावरायला त्यांना वेळ लागला, पण त्या पुन्हा फिल्मी दुनियेत परतल्या. नायिका होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं असलं तरी त्यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडायला सुरुवात केली. या सगळ्यात ललिता पवार यांना खरी ओळख मिळाली ती रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेतून. यात त्यांनी मंथरा ही व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेत ललिता यांनी अक्षरशः जीव ओतला होता, म्हणूनच आजही ही भूमिका साऱ्यांच्या स्मरणात आहे.

आयुष्याने अनेक भोग दिले..
ललिता यांना आयुष्याने अनेक प्रकारे मोडण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकवेळी अभिनेत्री धैर्याने उभी राहिली. व्यावसायिक आयुष्यात भरभरून यश पाहिलेल्या ललिता यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढ- उतारांचे पाहिले. ललिता यांचे पहिले लग्न गणपतराव पवार यांच्याशी झालेल. पण त्यांच्या पतीचे ललिता यांच्या धाकट्या बहिणीशी प्रेमसंबंध होते, त्यामुळे अभिनेत्रीने गणपतरावांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांनी चित्रपट निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केले.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद..
ललिता पवार यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. ललिता पवार तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या नकारात्मक पात्रांसाठी ओळखल्या जातात. या अभिनेत्रीने वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत बॉलिवूडमध्ये काम केले आहे. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी करिअरला सुरुवात केली. तसेच त्यांनी आपल्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत 700 चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीमुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

ललिता पवार (१८ एप्रिल १९१६, नाशिक – २४ फेब्रुवारी १९९८, पुणे) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. त्यानंतर त्यांच्या डोळ्याला इजा झाल्यानॆ त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. दूरदर्शनवरील रामायण या मालिकेमध्ये त्यांनी मंथरेची भूमिका केली होती.

१९२८ साली आर्यमहिला या मूकपटात त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतर गनिमी कावा (१९२८), जी. पी. पवारदिग्दर्शित ठकसेन राजपुत्र (१९२९), समशेर बहादूर (१९३०), चतुर सुंदरी (१९३०), पृथ्वीराज संयोगिता (१९३०), दिलेर जिगर (१९३१) इ. मूकपटांत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. पुढे बोलपटांची सुरुवात झाल्यानंतर त्यांना बोलपटातही चांगली कामे मिळू लागली. मुंबईच्या चंद्र आर्ट‌्सच्या हिम्मते मर्दा (१९३५) या बोलपटात त्या नायिका होत्या. या चित्रपटाचे नायक मास्टर भगवान होते. हाच त्यांचा मुख्य भूमिका असलेला पहिला बोलपट. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाचे दिग्दर्शक गणपतराव पवार होते.

१९३८ मध्ये टॉलस्टॉयच्या रेसरेक्शन या कादंबरीवरून दुनिया क्या है? (१९३८) ह्या चित्रपटाची निर्मिती ललिताबाईंनी केली आणि त्यात भूमिकाही केली. त्यातील गाणी त्यांनी स्वतःच म्हटली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे पती गणपतराव पवार यांनीच केले होते. भालजी पेंढारकरलिखित-दिग्दर्शित अरुण पिक्चर्सच्या नेताजी पालकर (१९३९) या चित्रपटात काशी या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे वठविली. हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनवधनाने घडलेल्या अपघातामुळे त्यांना चेहऱ्याच्या पक्षाघाताचा आजार झाला व या आजारपणात त्यांचा एक डोळा अधू झाला. परिणामी त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका मिळणे बहुतांशी बंद झाले. पुढे त्यांनी चित्रपटांमध्ये चरित्र भूमिका साकारण्यास सुरुवात केली. त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेले मराठी चित्रपट म्हणजे अमृत (१९४२), गोरा कुंभार, जय मल्हार (१९४७), रामशास्त्री (१९४४), अमर भूपाळी (१९५१), मानाचं पान (१९५०), चोरीचा मामला (१९७६) हे होत. प्रभातच्या रामशास्त्री या चित्रपटात त्यांनी महत्त्वाकांक्षी, निष्ठूर आणि करारी स्वभावाच्या आनंदीबाईंची भूमिका केली होती.

ललिताबाईंना अनाडी चित्रपटातील डिसा या भूमिकेकरिता फिल्मफेअरचा साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला (१९६०). त्यांना १९६१ साली संगीत नाटक अकादेमी पुरस्कार व १९७७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला. गृहस्थी, सजनी, अनाडी, घर बसा के देखो या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले.

मूकपटापासून बोलपटापर्यंतच्या सु. सात दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात चित्रपटसृष्टीत टिकून राहिलेल्या ललिता पवार चरित्रनायिका म्हणून विशेष लक्षात राहतात.

मृत्यूही झाला अत्यंत वाईट..
ललिता यांच्या आयुष्यातील अडचणी कधी संपल्याच नाहीत. त्यांना तोंडाचा कर्करोग झाला होता, त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचारही सुरू होते. पण त्यांचा शेवटचा काळ अत्यंत वाईट गेला. जेव्हा ललिता यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्या बंगल्यात एकट्या होत्या आणि पती रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी ललिता यांना पाणी द्यायलाही कोणी नव्हते. २४ फेब्रुवारी १९८८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. दुःखद बाब म्हणजे त्यांच्या निधनाची बातमीही साऱ्यांना तीन दिवसांनी कळली. पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडला असता त्यांचा तीन दिवस जुना मृतदेह आढळून आला होता.

Bollywood Stories: ऑनस्क्रीन मंथरा ललिता पवारच ऑफस्क्रिन आयुष्य...! एका थप्पडने आयुष्य केलं बरबाद..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button