? निर्मला गावित यांना शिवसेनेत मानाचे स्थान ?
नाशिक : गेल्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांना शिवसेनेत पक्षविस्तारासाठी संघटनात्मक जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. श्रीमती गावित यांनी नुकतीच पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नाशिकच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
माजी आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या नयना गावित त्यांच्या समवेत होत्या. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. पुढील वर्षी महापालिका तसेच जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणूका आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकसह लगतच्या जिल्ह्यात आदिवासी बहुल तालुके आहेत.
नाशिकसह या भागात आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. त्यांचे विविध प्रश्न यापूर्वीच्या सरकारच्या धोरणामुळे रेंगाळले आहेत. विशेषतः आदिवासी खावटी, आदिवासी विविध कार्यकारी सोसायट्यांनी वाटप केलेले कर्ज कोरोनासह गेल्या काही वर्षातील नैसर्गिक आपत्ती, बेमोसमी पावसामुळे थकले आहे. या सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे या संस्थांकडून आदिवासींना कर्ज वितरण होत नाही. या सोसायट्या पुर्ववत कार्यरत होण्यासाठी कर्जमाफीच्या योजनेप्रमामे आदिवासी सोसायट्यांचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. यांसारखे विविध प्रश्न असल्याने राज्य सरकारने त्यात पुढाकार घ्यावा अशी विनंती श्रीमती गावित यांनी यावेळी केली.
श्रीमती निर्मला गावित इगतपूरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाच्या उमेजदवार म्हणून सलग दोन वेळा आमदार होत्या. गेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यातील राजकीय वातावरणामुळे या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बदलेल अशी शक्यता होती. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या निवडणूकीत कॉंग्रेसचे हिरामन खोसकर विजयी झाले. श्रीमती गावित यांचा पराभव झाला असला तरीही 2009 मध्ये तीस हजार, 2014 मध्ये पन्नास हजार तर 2019 मध्ये पंचावन्न हजार मते मिळाली होती. त्यांच्या मतांमध्ये तिन्ही निवडणूकांत सातत्याने वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून श्रीमती गावित यांना संघटनात्मक जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. विशेषतः आदिवासी भागातील पक्षविस्तारासाठी काम करण्यासाठी त्यांच्याकडे विचारणा झाल्याने आगामी काळात माजी आमदार गावित पुन्हा कार्यकर्ते, नागरिकांशी संपर्क वाढवतील अशी स्थिती आहे.






