Maharashtra

? आरोग्याचा मुलमंत्र रजोनिवृत्ती (आहार व लक्षणे)

? आरोग्याचा मुलमंत्र रजोनिवृत्ती (आहार व लक्षणे)

मेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे पर्व आहे. या काळात वय वाढत असण्याची जाणीव, मोठी झालेली व त्यामुळे आईकडे दुर्लक्ष करणारी किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुले, वाढलेल्या व्यापात गर्क असणारा नवरा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेनोपॉज व या अनुषंगाने होणारा शरीरातील हार्मोन्सचा बदल या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्त्रीवर होत असतो.

मेनोपॉज म्हणजे पाळी थांबणे. रजोनिवृत्ती. शरीरातील स्त्रीबीजग्रंथी (ओव्हरी) वाढत्या वयानुसार काम करणे बंद करतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होते. आजकाल बहुतांश स्त्रिया नोकरी करणाऱ्या असतात. अशावेळी घरची जबाबदारी, ऑफिसचे वाढते काम या दोन्ही गोष्टींमुळे हा प्रश्न अधिकच बिकट होऊन जातो. आजकाल रजोनिवृत्तीमध्ये घेण्याची औषधे (हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी) याला याचमुळे अधिक महत्त्व येऊ लागले आहे.

मेनोपॉज म्हणजे काय?

स्त्रीबीजग्रंथीमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन महत्त्वाचे हार्मोन्स तयार होत असतात. ते मासिक पाळीचे नियमन करतात. जसजसे वय वाढते तसतसे या स्त्रीबीजग्रंथीमधील बीजांची संख्या कमीकमी होत जाते. स्त्रीबीजग्रंथी हळूहळू काम करणे बंद करतात किंवा थकतात म्हणा. परिणामी पाळी बंद होते. यालाच मेनोपॉज म्हणतात. म्हणजे थोडक्यात स्त्रीबीजग्रंथीतील स्त्रीबीज संपल्यामुळेच पाळी थांबते. परंतु ही सर्व प्रक्रिया अचानक होत नाही.

स्त्रीसाठी महत्त्वाचा काळ

ती जवळपास पाच वर्षांत म्हणजे वयाच्या ४५ वर्षांपासून ते ५०व्या वर्षापर्यंत पूर्ण होते. या सर्व प्रक्रियेचा शेवट हा पाळी बंद होण्यात होतो. अर्थात हा संपूर्ण काळच स्त्रीच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. रजोनिवृत्तीमध्ये होणारा त्रास हा ढोबळपणे तीन भागांत विभागला जाऊ शकतो. एक, लगेच होणारा त्रास. दोन, काही काळानंतर होणारा त्रास. तीन, बऱ्याच वर्षांनंतर होणारा त्रास.

लगेच होणारा त्रास

लगेच होणारा त्रास हा काही महिने ते काही वर्षे चालतो. दोन-तीन वर्षांत तो हळूहळू कमी होतो. यामध्ये, पाळी अनियमित होणे, पाळी जास्त किंवा कमी जाणे, कानावाटे गरम वाफा जाणे हे परिणाम दिसतात. कानावाटे गरम वाफा जाणे हा अत्यंत महत्त्वाचा व त्रासदायक परिमाण आहे. उष्ण अशा वाफा सुरुवातीला कानावाटे व मग चेहऱ्यावर, मानेवर व छातीवरदेखील जाणवायला लागतात. हा त्रास काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत राहतो.

चिडचिडेपणा

दिवसातून खूपवेळा हा त्रास होऊ शकतो. याशिवाय रात्रीच्यावेळी खूप घाम येतो. इतका की त्यामुळे अंगावरचे कपडे व इतकेच काय चादरदेखील ओलीचिंब होते. झोप न लागण्याचाही अनुभव येतो. त्यामुळे थकवा येणे, चिडचिड वाढणे, भीती वाटणे, आत्मविश्वास नसणे, विसरभोळेपणा इत्यादी प्रकारही होतात.

काही काळानंतर होणारा त्रास

हळूहळू लगेच होणारा त्रास कमी होत जातो, परंतु वेगळ्या प्रकारचा त्रास सुरू होतो. हा अधिक कष्टदायक असतो. यामध्ये लघवीमध्ये जळजळ, सारखी लघवी लागणे, हसल्याने किंवा खोकलल्याने लघवी होणे, संबंधाच्यावेळी त्रास होणे, हात, पाय, सांधे, कंबर दुखणे, सुरकुत्या येणे इत्यादी प्रकार मोडतात. जसजसे वय वाढते तसतसा हा त्रास अधिकच वाढत जातो. त्यामुळे स्त्रिया समारंभात किंवा बाहेर जाणे टाळतात. आत्मविश्वास गमावून बसतात

बऱ्याच वर्षांनंतर होणारा त्रास

हाड ठिसूळ होणे व हृदयरोगाचे प्रमाण वाढणे या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी उशिराच लक्षात येतात. बरेचदा हे दोन्ही आजार गंभीर म्हणजेच प्राण घेणारे ठरू शकतात. मेनोपॉजमुळे शरीरातील हाडांचे सर्वात जास्त नुकसान होते. भारतातील तीनपैकी एका स्त्रीला याचा त्रास होतो.

रजोनिवृत्ती मध्ये ठेवायचा आहार..

फोलेट वाढवा

दिवसाला ४०० मायक्रो ग्रॅम विटामिन बी फ्लोएट घेतल्यानं हृदयाचे रोगाची भीती कमी होते.

वजन योग्य प्रमाणात ठेवा

वजन कमी ठेवले की हृदयाचे रोग होण्याची शक्यता कमी होते. मेनोपॉजनंतरही हा त्रास होण्याची शक्यता कमी होते.

बोरोन व फायबर्स असलेलं अन्न घ्या

बोरॉनमुळे शरीरातले एस्ट्रोजन कायम राहते, जे मेनोपॉजच्या वेळेस कमी होण्याची शक्यता असते. फायबरनी कोलेस्ट्रोल कमी होते. दिवसाला २०-३० ग्रॅम फायबर शरीरासाठी पुरेसं ठरतं. सफरचंद, बीन्स‌, कोबी, स्ट्रॉबेरी, टोमॅटो यांतून फायबर व बोरॉन मिळतं

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button