Akkalkot

जनता संचार बंदीतील उत्स्फुर्त सहभागाबद्दल जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून आभार

जनता संचार बंदीतील उत्स्फुर्त सहभागाबद्दल

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून आभार

कृष्णा यादव, प्रतिनिधी,
सोलापूर दि.23. जनता संचारबंदी मध्ये समस्त जनतेने उत्सफुर्त सहभाग दाखवल्याबद्दल जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्री मिलींद शंभरकर यांनी सोलापूरवासीयांचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाचा विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी आज जनता संचार बंदी पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांत नागरिकांनी संचार बंदी पाळली.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला नागरिकांनी अभूत पूर्व प्रतिसाद दिला आहे. याबद्दल नागरिकांचे मी आभार मानतो. गर्दी टाळल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मदत होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. त्यामुळै नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे. गर्दी टाळावी. परदेशातून अथवा पुणे, मुंबईहून आलेल्या नागरिकांनी ताप, कोरडा खोकला अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण घरामध्ये अलगीकरण करण्यात आलेल्या (होम क्वारंटाईन ) नागरिकांची संख्या 138 आहे. त्यापैकी 56 लोकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना मुक्त करण्यात आले. उर्वरित 82 नागरिक अद्याप ही होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. सिव्हील हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आतापर्यंत एकूण 16 लोकांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 12 लोकांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यातआले. उर्वरित चार पैकी दोघे कोरोना बाधित लक्षणांच्या निकषांत बसत नाहीत. तसेच त्यांनी परदेशात प्रवास केलेला नाही किंवा परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. उर्वरित दोघांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. ते अहवाल उद्यापर्यंत मिळतील अशी अपेक्षा असून त्यांची प्रकृती ठीक आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी जिल्हयात 4 ठिकाणी 1) नांदणी-टाकळी, ता. द. सोलापूर 2) मरवडे, ता. मंगळवेढा 3) दूधनी, ता. अक्कलकोट 4) वागदरी, ता. अक्कलकोट येथे तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. या तपासणी केंद्रांवर आत्तापर्यंत 251 वाहनांमधील सुमारे 900 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे.

याशिवाय उद्यापासून भीमा नगर टेंभुर्णी, सराटी अकलूज् व नातेपूते येथे पूणे व सातारा येथून येणाऱ्या वाहनांची व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी नवीन तपासणी नाके उभारण्यात येत आहेत. सोलापूर जिल्हयाच्या शेजारच्या जिल्हयातून येणाऱ्या नागरीकांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांन्वये इतर जिल्हयातून ग्रामीण भागात येणाऱ्या जनतेने गावचे पोलीस पाटील यांचेकडे नोंदणी करावी व शहरी भागात येणाऱ्या नागरीकांनी नगरपालिका / महानगरपालिका यांचेकडे नोंदणी करावी.
आजच्या संचार बंदीच्या कालावधीत खबरदारीची उपाययोजना म्हणून सोलापूर शहरात दोन उपायुक्त, चार सहायक पोलीस आयुक्त , 18 पोलीसनिरीक्षक, 51 पोलीस उपनिरीक्षक आणि 757 पोलीस शिपाई तैनात करण्यात आले होते. पोलीस आयुक्तालयाच्याहद्दीत चौदा मार्चपासून आजपर्यंत 176 गुन्हे नोंद झाले आहेत. तर ग्रामीण पोलीस विभागाच्या हद्दीत 95 गुन्हे दाखल झाले आहेत. ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत आज सहा गुन्हे नोंदवण्यात आले. त्यापैकी पांगरी पोलीस स्टेशनमध्ये चार तर सांगोला आणि अकलूज येथे प्रत्येकी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ग्रामीण भागात बंदोबस्तासाठी 115 अधिकारी तर 1800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button