लॉकडाऊन काळात जुन्या फोटो शोधून भन्नाट कंमेंट् करण्याचा ट्रेंड
एक होतं घर ,घरात होती खुर्ची
भाऊंचा फोटो पाहून प्रेमात पडली आर्ची
दिवसभर गावात भाऊ करतो हवा, रात्री वहिनी म्हणते भाऊला खरकटे भांडे धुवा
लातुर प्रतिनिधी:- प्रशांत नेटके
सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड कोणत्याही क्षणी हिट करेल आणि कसा हिट ठरेल हे सांगता येत नाही. सध्या असेच अनेक ट्रेंड फेसबुकवर धुमाकूळ घालत आहे.
काय आहे हा ट्रेंड.
फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांचे जुने फोटो उकरून काढून त्यावर कमेंट करणे हा झाला ट्रेंड. जुने फोटो उकरून वर काढण्याचा हा काही पहिला ट्रेंड नाही. या आधी सुद्धा हा ट्रेंड अनेकदा चालला मात्र यावेळी यात जरा वेगळाच बदल झालाय. आपल्या मित्राचा एखादा जुना फोटो उकरून काढून त्यावर ‘चारोळी’ कमेंट करणे बर.
मित्र-मैत्रिणींच्या जुन्या फोटोंवर ‘भाऊ’ आणि ‘ताई’ या नावाने उखाण्याप्रमाणे यमक जुळवून चारोळ््या कमेंट्स करण्याचा हा ट्रेंड नेटकऱ्यांमध्ये भलताच हिट झाला आहे. कोरोनाच्या विषाणूने सध्या जगभरात थैमान घातले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी देशातही २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. कुणी बाहेर जाऊ शकत नाही आणि कुणी घरी येउ शकत नाही. त्यामुळे बहुतेकांचा वेळ एकतर टीव्ही किंवा मोबाईलवर घालवावा लागत आहे. मिळालेल्या फावल्या वेळेचा उपयोग इंटरनेटवर अधिक करीत आहेत. सोशल मीडियावरील हा वेळ अधिक मनोरंजक बनविण्यासाठी नेटकऱ्यांकडून नवनवीन शक्कल लढविली जात आहे. अशाच शक्कलीतून ‘भाऊ’ आणि ‘ताई’च्या फोटोंवर चारोळ््या कमेंट्स करण्याचा हा ट्रेंड सध्या भलताच लोकप्रिय झाला आहे. मित्र किंवा मैत्रीणीचे चार-पाच वर्षाआधीचे फोटो फेसबुकवरून उकरून काढायचे आणि त्यावर मजेदार कमेंट करायचे. विशेष म्हणजे येथेही कोरोना आणि लॉकडाउन हेच केंद्रस्थानी आहेत.
‘मॅडमचा फोटो पाहून पोर आली धावून, म्हणून सरकारला करावं लागलं २१ दिवस लॉकडाउन’,
‘कोरोनामुळे जगात सुरू झाली मंदी, आम्हाला ताईच्या लग्नात खायची आहे बुंदी’,
‘आला वारा गेला वारा, मॅडमचा फोटो म्हणजे कोरोनामध्ये सुंगंधित सॅनिटायझरचा फवारा’,
‘पगार मिळाला नाही म्हणून कामगारांनी केला संप, आमच्या मैत्रीणीच्या प्रेमात पडला चक्क डोनाल्ड ट्रम्प’,
या ताईवरच्या कमेंट्सनंतर भाऊच्या कमेंटसही धडाकेबाजच म्हणावे लागेल.
‘भुवयांच्या खाली डोळे अन डोळ््याखाली नाक, भाऊचा फोटा म्हणजे आ रा रा रा खतरनाक’,
‘संगळे शॉप आहेत बंद मिळतो फक्त किराणा, भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराणा’,
‘दिवसभर गावात भाऊ करतो हवा, रात्री वहिनी म्हणते भाऊला खरकटे भांडे धुवा…’
असे लई भारी चारोळ््या लोकांच्या मनोरंजनाचा विषय ठरल्या आहेत. फेसबुकवर जुन्या आणि सध्याचा छायाचित्रांमध्ये झालेला बदल बघून, हे नेटकरी शायरीचे कमेंट त्या छायाचित्रांवर लिहिण्यात व्यस्त आहेत. यात केवळ युवकच नव्हे तर पन्नासी गाठलेले ज्येष्ठ नागरिक देखील हा नवीन ट्रेंड पाळत आहेत.
याखेरीज साडीतले फोटो टाकण्याचेही चॅलेंज दिले जाते आहे. जुन्या काळातला एक व आताचा एक असेही एक चॅलेंज यावर दिसते आहे. याशिवाय जिमप्रेमींसाठीही अनेक चॅलेंजेस दिली जात आहेत.






