भावाच्या पुण्यतिथीचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले एकतीस हजार रुपये
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: सध्या देशा समोर कोरोना महामारीचे प्रचंड मोठे संकट उभे आहे. कोरोना विरुध्द ही लढाई जीवाचे रान करुन जिंकायचीचं म्हणून जो तो आपापल्या परीने मदत करतोय. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड -१९ या बँन्क खात्यातही समाजातील दानशूरांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. इंदापूर मधील सतिश केशव गलांडे यांनी आपल्या स्वर्गीय भावाच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या खर्चाला बगल देत ३१,०००/- रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे .
इंदापूर मधील गलांडवाडी नं.२ येथील सतिश केशव गलांडे यांच्या बंधूंचा तीन वर्षापूर्वी देहांत झाला.स्वर्गीय शरद केशव गलांडे यांची आठवण म्हणून ते प्रतिवर्षी पुण्यतिथी साजरी करतात. यावर्षी शरद यांची तिसरी पुण्यतिथी आहे. मात्र सध्या राज्यासह देशावर कोरोना या महाविषाणूचे सावट ओढावले आहे. या महाराक्षसाला हरवण्यासाठी समजातून सर्वोतपरी स्वच्छेने मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाचा सकारात्मक विचार करित व आपल्या बंधुची आठवण अनंत काळासाठी ताजी ठेवण्याचा विचार करुन गलांडे कुटुंबाने यावर्षी तिसऱ्या पुण्यस्मरणाला कोणताही खर्च न करता तो खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड -१९ यासाठी स्वच्छेने देऊ केला.
मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी याबाबतचा चेक त्यांनी इंदापूर येथील शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी सुपूर्त केला. तो चेक घेऊन तात्काळ शिवसेना पदाधिकारी व सतिश गलांडे तहसील कर्यालयात दाखल झाले. बारामती विभागाचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे तो सुपूर्त करण्यात आला.गलांडे परिवाराने देऊ केलेली ही मदत पाहून सतिश गलांडे यांचा आदर्श समाजाने घ्यावा अशी भावना दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केली.
यावेळी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी , शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे ,जि.प सदस्य अभिजीत तांबिले, हिंदुस्तान माथाडी कामगार सेनेचे चिटणीस दुर्वास शेवाळे, शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी ,योगेश वाघमोडे ,अमोल शिंदे ,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.






