तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा आरोग्य सेवाच सलाईनवर प्रशासन व लोकप्रतिनीधी सुस्त सुरगाणा तालुक्यात संर्पदंशाचा दुसरा बळी
आरोग्य सेवेचा हलगर्जीपणा
प्रतिनिधी विजय कानडे
आरोग्य सेवेच्या असुविधामुळे तालुक्यात सर्पदंशाचा दुसरा बळी गेला आहे. पळसन जवळील खडकीपाडा (काठीपाडा) येथील शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू झाला. झिमन जयराम गायकवाड असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
सकाळी साडे दहाच्या दरम्यान ही घटना घडली. झिमन सकाळी शेतात काम करताना त्यांना सर्पदंश झाला. उपचारासाठी त्यांना उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले परंतु तेथे उपचार न मिळाल्याने सुरगाणा येथे पाठवण्यास सांगितले. सुरगाणा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
उंबरठाण येथे शेतकऱ्यावर वेळीच उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असा प्रश्न शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. कालच तालुक्यातील मनखेड येथील लहान मुलास वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. आज लागलीच झिमन यांच्यावर ही वेळ आली. आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभे आहेत पण तेथे आरोग्य सुविधांबाबत उदासीनता जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.






