राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी शिवसेना संसदेत विधेयक आणणार
मुंबई पी व्ही आंनद
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीने संसदेत लवकरच विधेयक सादर करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे नेहमीच विरोधकांचे लक्ष्य राहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबरोबरच जे राष्ट्रपुरुष आहेत, त्यांच्याविषयी कुठेही अवमानकारक टिपणी, लिखाण, प्रतिक्रिया या माध्यमातून सातत्याने अभिव्यक्तीच्या नावाखाली अवमान करण्याची संधी जाणिवपूर्वक घेत बदनामी केली जाते. हा प्रकार रोखण्यासाठी हे खासगी विधेयक संसदेत सादर करण्यात येणार आहे. त्याचा पाठपुरावा करत लवकरच त्याचे कठोर कायद्यात रुपांतर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ज्यांना सावरकरांचे योगदान माहिती नाही, लायकी नाही, असे लोक वाट्टेल तसे बोलत आहे, लिखाण करत आहेत, त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातूनच कार्यवाही व्हावी, म्हणून हा मार्ग स्विकारण्यात येत आहे, त्याचबरोबर स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा सन्मान भारतरत्नाच्या माध्यमातून व्हावा, यासाठी ही मागणीही संसदेत जोरदार लावून, पाठपुरावा करून आणि स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करू. असा संकल्प देखील राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.
हिमालय पर्वतरांगेतील बातल प्रांतात सर केलेल्या शिखराला शिखर सावरकर हे नाव देण्याची कार्यवाही लवकरात लवकर व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना विनंती करू, असेही त्यांनी सांगितले.






