Politics:Udhhaw Thakre: शिवसेना आणि संभाजी एकत्र…!पहा 10 कारणे..!
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. केंद्रात भाजपाचे सरकार आहे. तर राज्यातदेखील शिवसेना आमदार फोडून भाजपाने सत्ता हस्तगत केली आहे. यावर यावेळी टीका करण्यात आली. प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा भाजपाचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळे अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी तसेच व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. भविष्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एक युती म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले.
पाच मुद्द्यांतून जाणून घेऊ, संभाजी ब्रिगेड-शिवसेना युती आणि परिणाम –
1) आंदोलनांमुळे चर्चेत –
संभाजी ब्रिगेड आपल्या आक्रमक आंदोलनांमुळे चर्चेत असते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभाजी ब्रिगेडचे काम चांगले आहे. निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली. त्यानुसार मागील निवडणुकादेखील संभाजी ब्रिगेडने लढविल्या होत्या.
2) मराठा समाज आकर्षित –
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडने इतर मराठा संघटनांसह आंदोलन केले. अजूनही संभाजी ब्रिगेड त्यावर काम करत आहे. अशावेळी मराठा समाजातील मतदारांना आकर्षित करण्यात हे दोन्ही पक्ष यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे.
3) बंडखोरांचा विरोध –
राज्यातील राजकारण ढवळून निघाले ते शिवसेनेतील बंडामुळे. शिवसेनेने आता त्यांना गद्दार म्हणत त्यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. बंड करणाऱ्यांना सर्वसामान्य साथ देत नाहीत, हा इतिहास वारंवार पटवून दिला जात आहे. अशावेळी संभाजी ब्रिगेडची मदत शिवसेनेला होणार आहे.
4) भाजपाला शह –
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजपा इतर पक्षांतील अनेकांना आपल्याकडे येण्यास भाग पाडत आहे. शिवसेना पक्षाला फोडून एकाकी पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसत असताना संभाजी ब्रिगेडशी युती शिवसेनेसाठी फायद्याची ठरणार आहे. आरपीआयचे काही गट शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे शिवसेना खचली नाही, हा संदेश यानिमित्ताने जाताना दिसून येत आहे.
5) लोकशाही वाचवण्यासाठी
– देशात अघोषित हुकूमशाही राज्य सुरू आहे. अशी टीका सातत्याने भाजपावर होत आहे. या वातावरणात लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत युती करत असल्याचे संभाजी ब्रिगेडने सांगितले.
6) मुंबई महापालिकेकडे लक्ष्य-
शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलं असलं तरीही सध्याच्या घडीला शिवसेनेसमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे मुंबई महापालिकेतील सत्ता वाचवणं. भाजपने पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त्या केल्यात. यात ओबीसी चेहरा असलेल्या चंद्रशेखर बावन्नकुळे यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद दिलंय. तर आशिष शेलार या मराठा चेहऱ्याला मुंबईचा अध्यक्ष केलंय. शेलारांच्या माध्यमातून भाजपने मराठा व्होट बँकेची सोय कील आहे. त्यामुळे मुंबईतील हा मराठा मतदानाचं ध्रुवीकरण करण्यासाठी शिवसेनेनं आता संभाजी ब्रिगेडला हाताशी धरलंय.
7) राष्ट्रवादीचं मराठा कार्ड भाजपकडे झुकतंय-
महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा ही राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वात मोठी व्होट बँक होती. मात्र मराठा आरक्षणाची मागणी लावून धरल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजालाही आपलंसं केलं होतं. छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेवर नियुक्ती देत भाजपने मराठा मतदारांचे ध्रुवीकरण केले. त्यामुळे शिवसेनेनंही आपली तत्त्व बाजूला ठेवत मराठा समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहेत.
8) हिंदुत्व सुटतंय, मराठा मुद्दा घेणार-
भाजप, बाळासाहेब ठाकरे- आनंद दिघेंचं नाव घेणारी शिंदेसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिघांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गेल्या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेवर कोंडीत पकडलंय. सर्व धर्म समभावाची परंपरा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर शिवसेनेत हिंदुत्व राहिलेलंच नाही, अशी टीका केली जातेय. त्यामुळे आता मराठा कार्ड हाती धरून राजकारण करण्याची रणनीती शिवसेनेनं आखलेली दिसून येतेय.
9) मराठा समाज शिवसेनेला प्रतिसाद देणार-
शिवसेनेचा इतिहास पाहता बहुजन समाजातील लोकांनाच त्यांनी पाठबळ दिलंय. मराठ्यांना बाजूला सारून बहुजन समाजातील माळी, साळी, कोळी आदी १२ बलुतेदारांना पुढे आणण्याचं काम शिवसेनेनं केलं. बाळासाहेब ठाकरेंचा हाच वसा उद्धव ठाकरेंनी घेतलाय. मात्र आता पक्षाचं अस्तित्वच धोक्यात आल्यानं मराठा समाजातील संघटनेनं शिवसेनेला पाठबळ दिलंय. पण राज्यभर पसरलेला मराठा समाज शिवसेनेला कितपत पाठिंबा देणार, हाही प्रश्न आहेच.
10) शिंदेंच्या फुटीचं नुकसान भरून निघणार-
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या मराठा आमदारांमुळे शिवसेनेला मराठा मतदारांची उणीव मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या मदतीने हे नुकसान भरून काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.






