पीक कर्ज वाटपासाठी 22 जून रोजी जिल्ह्यात मेळाव्यांचे आयोजन
प्रतिनिधी फहिम शेख
नंदुरबार दि.17- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून शेतकऱ्यांना कर्ज मिळविणे सुलभ व्हावे यासाठी 22 जून रोजी जिल्ह्यातील 105 बँक शाखांमार्फत पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधतांना दिली.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बँक मेळाव्याच्या माध्यमातून अर्ज स्विकारले जातील व त्याच ठिकाणी कर्जासाठी आवश्यक प्रक्रीया पूर्ण केली जाईल. मेळाव्याच्या ठिकाणी शेतकरी उपस्थ्िायत राहू शकत नसल्यास ग्रामसेवक किंवा तलाठी यांना अर्ज द्यावेत. हे अर्ज मेळाव्यात आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात 3 लाख 97 हजार 704 सातबारे आहेत. 1 लाख 66 हजार शेतकरी शेती करत आहेत. त्यापैकी 68 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. 1 लाख 17 हजार 800 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येत आहेत. जिल्ह्यात 105 प्रकारच्या बँक शाखा असून गतवर्षी जिल्ह्याचे पीक कर्जाचे उद्दीष्ट 729 कोटी होते. त्यापैकी 40 टक्के उद्दीष्ट गाठण्यात आले होते. या वर्षी 769 कोटींचा पीक कर्ज आराखडा बनविण्यात आला आहे.
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना या वेबलिंकवर माहिती भरायची आहे. या माहितीसोबत कर्जासाठी वेगळा अर्ज भरायचा आहे. वेब लिंकवरील माहितीवरून जिल्हा प्रशासन बँकाकडे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. बँकांनी 10 दिवसात अर्जावर कार्यवाही करून शेतकऱ्यास पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे.
पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळणार आहे. अशा लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सातबारा आणि पीकपेरा अशी दोनच कागदपत्रे अर्जासोबत सादर करावे लागतील. यासोबत नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील 10 दिवसात कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. मागच्या वर्षी कर्जमाफी येाजनेत नाव आलेल्या शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेकडून निर्देश आल्यावर कर्ज मिळण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले नसेल त्यांना 1 लाख 60 हजारापर्यंत कर्ज देण्यासाठी कर्जाची नोंद सातबाऱ्यावरही घेण्यात येत नाही. अशा शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा, आधारकार्ड, पॅनकार्ड, आठ अ, फेरफाराची नक्कल, चतु:सिमा, बागायती असेल तर सातबारा विहीरीची नोंद, पीक पेरा प्रमाणपत्र, ऊस लागवड असेल तर साखर कारखान्याचे प्रमाणपत्र आदी 12 कागदपत्रे आवश्यक असतील.
शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेसेाबत अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्यातील बिमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, सुरक्षा विमा योजनेचादेखील लाभ घ्यावा. कर्जाबाबत समस्या असल्यास जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक देशपांडे (02564- 222229, 9923601656) किंवा नाबार्डचे अधिकारी प्रमोद पाटील (9987667891) यांना संपर्क साधावा. मोबाईल क्रमांकावर केवळ आपल्या अर्ज भरल्याच्या स्लिपसह संदेश पाठवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
000000






