Mumbai Diary: राज्यातील धरणांमधील जलप्रदूषण रोखण्यासाठी आ. तांबे यांचा पुढाकार – राज्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील प्रदूषण रोखण्याबाबत आवाहन
– प्रदूषित धरणांबाबत जलसंपदा मंत्रीना दिलं निवेदन
प्रतिनिधी
यंदा पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहेत. परिणामी राज्यभरात दुष्काळाचे सावट घोंघावू लागले आहे. यातच मुंबईसह महत्त्वाच्या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील प्रदूषण रोखण्याबाबत नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी कंबर कसली असून, धरणांमधील प्रदूषण रोखण्यासाठी जलसंपदा मंत्री, मंत्रालयाला पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ०७ जलाशयात रविवारपर्यंत ९० टक्के पाणीसाठा असून, वातावरणातील बदल आणि पावसाचा जोर कमी असल्यामुळे मुंबईकरांना पाणी कपाती सारख्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, इतर धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठ्यासोबतच मुंबईसह अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जल प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या जल प्रदूषणामुळे वाहत येणारे पाणी सुद्धा बऱ्याचदा प्रदूषित असते. तसेच धरणांच्या आजूबाजूच्या विकास कामाच्याबाबतीत सरकारचे ठोस धोरण नसल्यामुळे धरणांच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना आरोग्यासह आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे, असे आ. सत्यजीत तांबे यांनी पत्रात नमूद केले आहे.
एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तर मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. तसेच धरण परिसरातील प्रदेशाच्या विकासाबाबत ठोस धोरण तयार करून जलाशयांमधील जल प्रदूषण कसे कमी होईल. याबाबत उपाययोजना करून, पुढाकार घ्यावा. तसेच आ. सत्यजीत तांबे यांचे उपक्रमाला सहकार्य असून, लोकसहभाच्या माध्यमातून या समस्या दूर होतील, असा विश्वास आ. सत्यजीत तांबे यांनी जलसंपदा मंत्र्यांना दिला.






