शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत उपलब्ध करुन द्या -डॉ.राजेंद्र भारुड
फहिम शेख
नंदुरबार दि.26 : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या तसेच नवीन पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे ,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँक प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपाडे उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यातील सर्व बँक शाखांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट जून अखेरपर्यंत पूर्ण करावे. 10 जूनपर्यंत किमान 50 टक्के उद्दीष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी असलेल्या प्रक्रीयेची माहिती देण्यासाठी दोन महिन्यासाठी प्रतिनिधींची नेमणूक करावी, तसेच एसएमएस सुविधेचा उपयोग करण्यात यावा. यावर्षी कर्ज वाटपाचे किमान 90 टक्के उद्दीष्ट पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक गावनिहाय समन्वयक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल. त्यांच्या सहकार्याने बँक अधिकाऱ्यांनी गावातील अधिकाधीक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. गावनिहाय मोहिमस्तरावर हे काम पूर्ण करण्यात यावे. कर्ज मिळण्याची प्रक्रीया अत्यंत सोपी असल्याचेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात गतवर्षी पीक कर्ज वाटपाचे 39 टक्के उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी 615.98 कोटींचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले असून आतापर्यंत 40 कोटी 17 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात 17 बँक प्रतिनिधींना व्हीसॅट आणि सोलर ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्डने 43 लाख रुपये मंजूर केले आहेत. तसेच जिल्हा सहकारी बँक शाखांना 80 मायक्रो एटीएमसाठी 18 लाख रुपये मंजूर केले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. अक्कलकुवा आणि धडगाड भागात नव्या बँक शाखा सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
0000






